Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं जगाची चिंता वाढली आहे. अशातच रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं एका खाजगी यूएस कंपनीचा हवाला देत वृत्त दिले आहे की, 40 मैल (सुमारे 64 किमी) लांबीचा रशियन लष्करी ताफा युक्रेनची राजधानी कीवच्या दिशेनं जात आहे. सॅटेलाईट फोटोच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, खाजगी यूएस कंपनीनं सांगितलंय की, सोमवारी घेतलेल्या सॅटेलाईट फोटोंमध्ये युक्रेनची राजधानी कीवच्या उत्तरेला रशियन लष्करी ताफा दिसला, जो यापूर्वी दिसलेल्या 17 मैल (27 किमी) पेक्षा जास्त लांब आहे.
मॅक्सर टेक्नॉलॉजीजनं (Maxar Technologies) असंही म्हटलं आहे की, अतिरिक्त भूदल तैनाती आणि जमिनीवर हल्ला करणारे हेलिकॉप्टर युनिट्स युक्रेनियन सीमेच्या उत्तरेस 20 मैल (32 किमी) पेक्षा कमी दक्षिण बेलारूसमध्ये दिसले. या चित्रांवरून असं दिसून येतं की, रशिया आपले हल्ले अधिक तीव्र करण्याच्या योजना अंमलात आणण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. दरम्यान, दुसरीकडे, अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यानं दावा केला आहे की, रशियन सैन्याच्या वतीनं सध्या कीवच्या दिशेनं कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यानं मंगळवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) सांगितलं की, युक्रेनची राजधानी कीवकडे रशियन सैन्याची हालचाल सध्या ठप्प आहे. अधिकार्यानं रशियन सैन्यासाठी अन्नाच्या कमतरतेसह अनेक घटकांचा उल्लेख केला आणि सांगितलं की, कीववर चाल करुन जाणारं रशियाची सैन्य काल जिथपर्यंत पोहोचलं होतं, सध्या तिथेच आहे.
अधिकार्यानं असा दावा केलाय की, रशियन सैन्याला केवळ इंधन तुटवड्याचा सामना करावा लागत नाही. तर त्यांना अन्नाची कमतरता देखील भासत आहे. अधिकाऱ्यानं दावा केलाय की, युक्रेनच्या वतीनं करण्यात येणारा प्रतिकार हा देखील संभाव्य कारण असू शकतं.
ते म्हणाले की, रशियन संरक्षण मंत्रालयानं उघडपणे कबूल केलंय की, ते कीवमधील नागरी भागांना लक्ष्य करणार आहेत. रशियाने आतापर्यंत युक्रेनच्या तळांवर 400 हून अधिक क्षेपणास्त्रं डागली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- रशियाच्या मदतीला 'हिवाळा'! इतिहास सांगतोय... हिवाळ्याच्या मदतीने रशियाने अनेक शत्रूंना लोळवलंय
- SWIFT : रशियाच्या आर्थिक नाड्या आवळणारा SWIFT निर्बंध आहे तरी काय?
- Russia Ukraine War : कॅनडाकडून रशियन तेल आयातीवर बंदी, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले...
- LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha