भूवनेश्वर : कोविडची लागण होऊन मरणाशी झुंज देत असलेल्या 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर अमृत प्रधानला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून भूवनेश्वराहून चेन्नईला हालवण्यात आलं आहे. परिस्थिती अगदीच बेताची असलेल्या या युवकाच्या मदतीसाठी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आतापर्यंत 65 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याच्या उपचारासाठी एकूण 2 कोटी रुपयांची गरज आहे. 


अमृत प्रधानवर भूवनेश्वरच्या एम्समध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्यात कोविडची लागण झाल्यानंतर अमृतच्या फुफ्फुसांमध्ये न्युमोनियाची लागण झाली होती. स्थिती गंभीर होताच त्याला चेन्नईला दाखल करण्याचं ठरवण्यात आलं. त्यामुळे भूवनेश्वर एम्स ते बिजू पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्ट या दरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार करुन केवळ 11 मिनीटांमध्ये पोहचवण्यात आलं. तिथून एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने त्याला चेन्नईला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


सोशल मिडीयाच्या माध्यमातून उपचारासाठी निधी
मध्यमवर्गीय असल्याने अमृत प्रधानची आर्थिक परिस्थीती काही उत्तम अशी नाही. त्यामुळे उपचारासाठी लागणारे 2 कोटी रुपये कसे उभा करायचे असा प्रश्न त्याच्या पालकांसमोर होता. अशावेळी अमृतच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या मदतीने क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आतापर्यंत 65 लाख रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत 5831 लोकांनी या माध्यमातून पैसे दिले आहेत. अजूनही मदतीचा ओघ सुरुच आहे. 


अमृतचा जीव वाचवण्यासाठी अपोलो रुग्णालयामध्ये Extracorporeal membrane oxygenation(ECMO) या मशिनची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी त्याच्या जीवाला काही धोका नसल्याचं रुग्णालयाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. आता अमृतचे लंग ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. या सर्वातून त्याला बरे होण्यासाठी दोन महिने तरी लागण्याची शक्यता आहे असंही रुग्णालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.  


दरम्यान, अमृतच्या अनेक नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन केलं आहे.


 




महत्वाच्या बातम्या :