जिनेव्हा : उद्या होणाऱ्या पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या वेगवेगळ्या संघटनांनी हे दशक 'Decade of Restoring Ecosystems' म्हणजेच परिसंस्था पुनर्संचयनाचं दशक म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलाय. जागतिक तापमान वाढ जर 2 अंश सेल्सियसपेक्षा कमी ठेवायचं असेल आणि वाढत्या लोकसंख्येची अन्नसुरक्षा साधायची असेल तर या परिसंस्थांचं पुनुरुज्जीवन करणं अत्यंत आवश्यक असल्याचं यूएनने आपल्या एका अहवालात सांगितलं आहे. 


 






यूएन एनव्हॉरमेन्ट प्रोग्राम (UNEP) आणि फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या (FAO) एका अहवालात असं सांगण्यात आलं  आहे की, 1990 च्या दशकानंतर आतापर्यंत मानवाने आपल्या गरजेपेक्षा 1.6 पटीने पर्यावरणातील स्त्रोतांचा अतिरिक्त वापर केला आहे. या काळात जगभरात जवळपास 420 मिलियन हेक्टर जंगलांची तोड करण्यात आली आहे. आता पर्यावरणाचा झालेला हा ऱ्हास जर भरुन काढायचा असेल तर जगभरामध्ये किमान एक बिलियन एकर क्षेत्राचे आणि तितक्याच समुद्री प्रदेशाचं पुनरुज्जीवन करायला हवं असंह या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 


जगभरातल्या समुद्री परिसंस्थेपैकी दोन तृतीयांश परिसंस्थेचा ऱ्हास झाला आहे. त्याला प्लॅस्टिक प्रदुषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ही गोष्ट जर ध्यानात घेतली तर आपण जे मासे खातो त्यामधूनही हे प्लॅस्टिक आपल्या पोटात जातं. त्यामुळे या समुद्री परिसंस्थेच्या ऱ्हासाकडं गंभीरतेनं पहायला हवं आणि याच्याही संवर्धनासाठी जगभरातील लोकांनी एकत्र यायला हवं असं यूएनने म्हटलं आहे. 


पर्यावरणाचा ऱ्हास, वातावरण बदलाचा मोठा फटका हा गरीब लोकांना, महिला, आदिवासी तसंच इतर संवेदनशील लोकांना बसतो, तेच या बदलाचे बळी ठरतात. कोरोनाच्या महामारीमध्ये हे प्रकर्षानं जाणवलंय असंही यूएनच्या या अहवालात सांगण्यात आलं आहे. 


परिसंस्था पुनर्संचनयाचं काम हे केवळ यूएन सारख्या एकट्या संस्थेचं नसून ते जगभरातील लोकांनी एकत्र येऊन करायचं आहे, त्यामुळे येत्या काळात आपण शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करु असं यूएन एनव्हॉरमेन्ट प्रोग्रामने म्हटलं आहे. 


 






येत्या दशकात आपण जर या परिसंस्थांचे पुनर्संचयन करु शकलो नाही तर आपण पॅरिस करार आणि शाश्वत विकासाचे ध्येय गाठू शकणार नाही अशी चिंता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा थेट फटका हा जगभरातील 3.2 अब्ज लोकसंख्येला म्हणजे 40 टक्के लोकसंख्येला बसत आहे. प्रत्येक वर्षी आपण ऱ्हास करत असलेल्या पर्यावरणाचा विचार केला तर तो जगभरातल्या अर्थव्यवस्थेतील 10 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे वातावरण बदलाचा धोका आहेच पण त्यामुळे जगभरातील अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. अशाच पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला तर अन्नसुरक्षेच्या अभावी अनेक लोकांना उपाशी पोटी रहायला लागेल असं यूएनच्या या अहवालात म्हटलं आहे. 


जगभरातील 126 नोबेल विजेत्यांनी आपली मतं "Our Planet, Our Future: An Urgent Call for Action" या यूएनच्या प्रकाशनात मांडली आहेत. त्याच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या :