नवी दिल्ली : शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची सीबीएसईचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबतच्या बैठकीत चर्चा करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक एन्ट्री घेतली. त्यांनी सीबीएसई बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत रद्द झालेली परीक्षा आणि त्याच्या परिणामांबाबत बातचीत केली. ही बैठक 3 जून रोजी दुपारी आयोजित केली होती.


पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (31 मे) उच्चस्तरीय बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या प्रस्तावावर चर्च केल्यानंतर बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर देशाच्या कानाकोऱ्यातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक बारावीचा निकाल आणि विद्यापीठातील प्रवेशाबाबत काळजीत होते. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत येऊन पालक आणि विद्यार्थ्यांशी बातचीत केली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली.


आमच्या मनात परीक्षेची भीती नव्हती : विद्यार्थिनी 
व्हर्चुअल मीटिंग दरम्यान पंतप्रधान म्हणाले की, "बारावीचे विद्यार्थी कायम आपल्या भविष्याचा विचार करतात. 1 जूनपर्यंत तुम्ही सगळे परीक्षेच्या तयारीत असाल." यावर एका विद्यार्थिनीने उत्तर दिलं की, "सर, परीक्षा उत्सवाप्रमाणे साजरी करावी असं तुम्हीच म्हटलं होतं. त्यामुळे आमच्या मनात परीक्षेची कोणतीही भीती नव्हती."






भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त रिसर्च करा : पंतप्रधान
बैठकीदरम्यान हिमाचल प्रदेशातील एका विद्यार्थिनीने बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले तर मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त निंबध लिहिण्यास आणि त्यावर अभ्यास करण्यास सांगितलं आहे.