(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid Vaccination: कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांचा पंतप्रधान मोदींकडून आज आढावा,मुख्यमंत्र्यांसह विविध राज्यांतील जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
Covid Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज महाराष्ट्रासह अशी राज्यं जिथं कोरोना लसीकरण कमी झालंय, अशा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
PM Narendra Modi review Covid vaccination : जी 20 शिखर परिषद आणि हवामान बदल परिषद 26(COP26) मध्ये सहभागी होऊन देशात परतल्यानंतर लगेचच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण (Covid Vaccine) झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीचा पहिला डोस 50% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचा या बैठकीत समावेश असेल. झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि अन्य राज्यातील कमी लसीकरण व्याप्ती असलेल्या 48 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
Corona Vaccine : राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आरोग्य मंत्र्यालायाच्या माहितीनुसार, 27 राज्यातील 48 जिल्ह्यांमध्ये लसीकरण संथ गतीनं सुरु आहे. उत्तरेकडील मणिपूर आणि नागालँड या राज्यातील प्रत्येकी 8-8 जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील सर्वाधिक जिल्ह्यांचा समावेश आहे. झारखंडमधील 9 जिल्ह्यात 50 टक्केंपेक्षा कमी लोकांनी पहिला डोस घेतलेला नाही. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीपूर्वी या राज्यात विशेष लसीकरण मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला घरी जाऊन लसीकरण केलं जणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत मनसुख मंडाविया यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचा मुद्दा उपस्थित केला होता. 10.34 कोटी लोकांनी निर्धारित वेळेत दुसरा डोस घेतला नसल्याचं मंडाविया यांनी आपल्या बैठकीत सांगितलं होतं. तसेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व पात्र असणाऱ्यांना पहिला डोस देण्यात यावा, अशी सूचना दिली होती.
देशात 107 कोटींहून अधिक लसीचे डोस दिले
देशामध्ये मंगळवारपर्यंत कोविड-19 वरील लसीचे 107 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मंगळवारी एका दिवसात 37,38,574 डोस देण्यात आले आहेत.
30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लसीकरणाला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.