Covid-19 vaccine | कोरोनावर भारतीय लस राहणार 'इतकी' टक्के प्रभावी; आयसीएमआरची माहिती
कोरोनावरील कोणत्या लसीला परवानगी देण्यात येईल याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) महत्त्वाची माहिती दिली आहे.
Covid-19 Vaccine : संपूर्ण देशभरात कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अनेक देशांतील संशोधक कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातही कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक लसींच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. तसेच लसीच्या सर्व चाचण्या लवकरात लवकर यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच कोरोनावरील कोणत्या लसीला परवानगी देण्यात येईल याबाबत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (ICMR) महत्त्वाची माहिती दिली आहे.
भारतात कोरोना वॅक्सिन 50 ते 100 टक्के प्रभावी ठरण्याची अपेक्षा आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, ICMR कोविड वॅक्सिनला 100 टक्के प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.
भारतामध्ये कोविड वॅक्सिनचा परिणाम 50-100 टक्क्यांमध्ये
"श्वसनाच्या आजाराशी निगडीत कोणतीही लस 100 टक्के प्रभावी नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कोणत्याही लसीमध्ये सुरक्षा, इम्युनोजेनिसिटी आणि कार्यक्षमता आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं 50 टक्के कार्यक्षमता असलेल्या लसीलाही मंजुरी देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. आमचं लक्ष्य 100 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचं आहे. परंतु त्याची कार्यक्रमता 50 ते 100 टक्क्यांमध्ये असेल.", अशी माहिती आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉक्टर बलराम भार्गव यांनी स्वास्थ आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ऑक्सफर्डच्या लसीच्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये उत्तम निरिक्षणं नोंदवण्यात आली आहेत. लस इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर करण्यात यशस्वी ठरली आहे. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार भारतात तयार झालेली लस ही अधिक प्रभावी ठरणार आहे. त्याचं कम्पोझिशन सुलभ असून सुरक्षिततेकडेही लक्ष देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोना वॅक्सिन संदर्भात काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. 39 पानांच्या या गायइडलाइन्समध्ये कंपन्यांसाठी सुरक्षात्मक प्रोटोकॉल्सची यादी दिली आहे. ज्याचं पालन कंपन्यांना करावं लागणार आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने जारी केलेल्या गाइडलाइन्स :
मंजुरीसाठी पाठवण्यात येणारी लस उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण करणारी असावी.
ज्या व्यक्तीला लसीचा डोस देण्यात येईल त्याच्या शरीराला एका वर्षासाठी संसर्गापासून सुरक्षा मिळावी.
जेव्हा कंपन्या वेगवेगळ्या टप्प्यात 30-50 टक्के परिणाम सिद्ध करतील, तेव्हा त्या लसची नियामक मान्यता त्याच स्थितीत असेल.
लस संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरली पाहिजे, अन्यथा संसर्ग होण्याचा धोका 50 टक्के तरी कमी झाला पाहिजे.