Coronavirus | देशात 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार : डॉ. हर्षवर्धन
जगभरातील कोरोना बाधित टॉप-10 देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. अशातच देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिली आहे.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख 38 हजार 845 झाली आहे. यामुळेच जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी देशातील वैज्ञानिकही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिली आहे.
भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्या सोशल मीडियावरून साधलेल्या ऑनलाईन संवादात बोलताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, 'संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारी रोखण्यासाठी लस विकसित करत आहे. लस तयार करण्यासाठी 100 हून अधिक जण काम करत असून विविध टप्प्यांवर काम केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांसाठी मदत करत आहे.'
पाहा व्हिडीओ : देशात कोरोनावर 14 लसींवर काम सुरु : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, 'भारतातही कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु असून अनेक वैज्ञानिक सक्रियरित्या काम करत आहेत. आपल्या देशात 14 ठिकाणी काम सुरु असून विविध टप्प्यांमध्ये हे संशोधन केलं जात आहे.' ते म्हणाले की, 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे.' पुढे बोलताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, 'जे कोणी लस शोधण्यासाठी काम करत आहेत. त्यांना आर्थिक मदत आणि नियमांनुसार, परवानगी देण्यात येणार आहे. 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार आहे.'
संंबंधित बातम्या :
कोरोना लसची प्राथमिक मानवी चाचणी यशस्वी, अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीचा दावा
आम्ही कोरोनावर प्रभावी औषध शोधलंय; बांग्लादेशी डॉक्टरांचा दावा