नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांच्या मोफत शिक्षणासंदर्भात मागणी केली आहे.  कोरोना साथीच्या आजारामुळे आई-वडील किंवा त्यांच्यातील एकाला गमावले आहे, त्यांच्या मुलांना नमोदय शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याच्या विचार करावा. या मुलांना चांगल्या भविष्याचा विचार करणे राष्ट्र म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे, असंही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं.


कोरोना साथीच्या भयावह परिस्थितीत बर्‍याच मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा घरातला कमावत्या व्यक्तीला गमावले आहे, अशा बातम्या येत आहेत. यामुळे या मुलांना मोठा धक्का बसला आहे. कोरोना महामारीमुळे अशा मुलांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या शिक्षण आणि भविष्यासाठी कोणतीही मदत उपलब्ध नाही, त्यांना आधार देणे गरजेचं आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं. 






माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात नवोदय विद्यालयांची उभारणी केली होती. सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात या नवोदय विद्यालयांचा उल्लेख केला आहे. सध्या देशात 661 नवोदय विद्यालय सुरु आहेत. कोरोनाने ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमावले आहेत किंवा कमावत्या पालकाचं निधन झालं आहे, त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण द्यावं, असं पत्र सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.