नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरताना दिसत आहे. मात्र अजूनही देशभरात रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार हात धुण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र देशातील 50 टक्के लोक अजूनही मास्क वापरत नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 


एका सर्वेक्षणाच्या आधारे केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संकट गंभीर असताना देखील 50 टक्के लोक मास्कचा वापर करत नाहियेत. तसेच जे लोक मास्क वापरतात त्यापैकी 64 टक्के लोक मास्कद्वारे नीट नाक झाकत नाहीयेत. 


आरोग्य मंत्रालयने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 25 शहरांमध्ये यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळे ही माहिती समोर आली आहे. 20 टक्के लोक आपला मास्क तोंडाच्या खाली ठेवतात. तर 2 टक्के लोक मास्क मानेवर अडकवून ठेवतात. तसेच 50 टक्के मास्क वापरणाऱ्या लोकांपैकी फक्त 14 टक्के लोक असे आहेत की जे योग्यरित्या मास्क वापरत आहेत. 


डबल मास्क फायदेशीर


डबल मास्क वापरणे सुरक्षित असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन (CDC) ने याबाबत परीक्षण केलं होतं, यामध्ये अशी माहिती मिळाली की डबल मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव 95 टक्के रोखला जाऊ शकतो.   


डबल मास्क कसा वापरायचा? 



  • दोन सर्जिकल मास्क असल्यास ते अशा पद्धतीने लावा की तोंड आणि नाक नीट झाकले जाईल. मात्र दोन सर्जिकल मास्क लावण्याचा सल्ला सहसा दिला जात नाही. 

  • एक कापडी मास्क आणि एक सर्जिकल मास्क असल्यास प्रथम सर्जिकल मास्क लावावा आणि त्यावर कापडी मास्क लावावा. 

  • जर N-95 मास्कचा वापर करत असाल तर तुम्हाला डबल मास्कची गरज लागणार नाही. कारण कोरोना विषाणूंपासून संरक्षणासाठी N-95 मास्क चांगल्या दर्जाचा आहे. 


या गोष्टी लक्षात ठेवा



  • सर्जिकल मास्कचा वापर केवळ एकदा केला जाऊ शकतो.  

  • सर्जिकल मास्क वापरल्यानंतर त्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट करावी. 

  • तसेच कापडी मास्क वापरत असाल तर तो मास्क रोज गरम पाण्यात धुवा. 

  • मास्क काढत असता बोलणे टाळा. मास्क काढल्यानंतर हात सॅनिटाईज करा. 


इतर महत्त्वाच्या बातम्या