Coronavirus Cases: काळजी घ्या... दोनच दिवसांत दुप्पट कोरोनाबाधितांची नोंद; नव्या रुग्णांची संख्या 10 हजार पार
Covid-19 in India: देशभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असून दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. गेल्या 24 तासांत भारतात 10 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद.
Coronavirus Cases in India: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid-19) दिवसागणिक वाढताना दिसतोय. अशातच सर्वांच्याच मनातील धाकधूक वाढली आहे. आरोग्य मंत्रालयानं (Indian Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,158 नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे. यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजेच, 11 एप्रिलच्या तुलनेत 12 एप्रिल रोजी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 11 एप्रिल रोजी देशात एकूण 7,830 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते.
राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,149 नवे रुग्ण आढळले आहेत. यानंतर दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट 23.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं होणारी वाढ पाहता दिल्ली एम्सनं रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. तसेच, मुंबईतही महानगरपालिकांच्या रुग्णालयांमध्ये कोरोना मास्क वापरणं अनिर्वाय केलं आहे.
कोरोना रुग्णांची संख्या पुढील 10 दिवसांत आणखी वाढणार
आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, कोरोनाबाधितांची संख्या पुढील 10 दिवसांत आणखी वाढणार आहे. परंतु त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येईल. नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल. दरम्यान, आज देशात नोंदवण्यात आलेला कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक आहे.
प्रौढांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी काल (बुधवारी) बोलताना प्रौढांना बुस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांनी कोविशील्ड लसीचं उत्पादन पुन्हा सुरू केलं आहे. कंपनीकडे आधीच कोवॅक्स लसीचे सहा दशलक्ष बूस्टर डोस उपलब्ध आहेत.
राज्यात एकाच दिवसात 1,115 रुग्णांची नोंद
राज्यातही कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढतच आहे. काल (बुधवारी) राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार केला आहे. आज राज्यात कोरोनाच्या 1,115 रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे तब्बल नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी राज्यात 919 रुग्णांची नोंद झाली होती तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेने आज दोन्ही संख्येत मोठी भर पडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण होत आहे.
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असून आजघडीला राज्यात 5,421 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईत आढळते. मुंबईत सध्या 1577 सक्रिय रुग्णसंख्या असून त्या खालोखाल ठाण्यात 953 आणि पुण्यात 776 सक्रिय रुग्णसंख्या आढळते.