देशात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखांच्या पार, तीन दिवसात 15 हजार रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 139 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात 4 हजार 970 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 134 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 139 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 39 हजार 174 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 38.73 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 58 हजार 802 आहेत. देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 हजार 058 झाला आहे. त्यातील 8 हजार 437 बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 24.06 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 249 जण मृत्यूमुखी पडले आहेत.
विविध राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या
* केरळमध्ये 630 रुग्ण, त्यातील 497 बरे झाले, 4 मृत. रिकव्हरी रेट 78.88 टक्के, गेल्या आठ दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 78 टक्क्यांवर आला आहे.
* तामिळनाडू 11, 760 रुग्ण, त्यापैकी 4,406 बरे झाले, मृतांचा आकडा 81, रिकव्हरी रेट 37.46 टक्के
* गुजरात 11,745 रुग्ण, त्यामधील 4,804 बरे झाले, मृतांचा आकडा 694, रिकव्हरी रेट 40.90 टक्के
* दिल्ली 10, 054 रुग्ण, पैकी 4,485 बरे झाले, मृतांचा आकडा 168, रिकव्हरी रेट 44.60 टक्के
* राजस्थान 5, 507 रुग्ण, त्यातील 3,218 बरे झाले, मृतांचा आकडा 138, रिकव्हरी रेट 58.43 टक्के
* मध्यप्रदेश 5, 236 रुग्ण, त्यामधील 2,435 बरे झाले, मृतांचा आकडा 252, रिकव्हरी रेट 46.50 टक्के
* पश्चिम बंगाल 2, 825 रुग्ण, त्यापैकी 1006 बरे झाले, मृतांचा आकडा 244, रिकव्हरी रेट 35.61 टक्के
एकाच दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी आढळला होता. एका रुग्णापासून 10 हजार रुग्ण संख्या होण्यासाठी सुमारे अडीच महिन्याचा कालावधी लागला होता. भारतात 13 एप्रिल रोजी कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला होता. पण मे महिन्यातील 16 आणि 17 तारखेला म्हणजे दोन दिवसातच कोरोनाचे 10 हजारांपेक्षा रुग्ण समोर आले आहेत. 17 मे रोजी 24 तासात 5 हजार 200 पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर 16 मे रोजी 4 हजार 800 पेक्षा जास्त रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात भारत अकराव्या स्थानी आहे. तर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आहेत. एक नजर टाकूया कोणत्या देशात किती कोरोनाचे रुग्ण आहेत त्यावर..
* अमेरिका - 15 लाख 08 हजार 598
* रशिया - 2 लाख 90 हजार 678
* ब्राझिल - 2 लाख 55 हजार 368
* युनायटेड किंग्डम - 2 लाख 47 हजार 709
* स्पेन - 2 लाख 31 हजार 606
* इटली - 2 लाख 25 हजार 886
* फ्रान्स - 1 लाख 80 हजार 051
* जर्मनी - 1 लाख 76 हजार 551
* तुर्की -1 लाख 50 हजार 593
* इराण - 1 लाख 22 हजार 492
* भारत - 1 लाख 1 हजार 139