Coronavirus Cases : कोरोनाची वाढती डोकेदुखी! देशात 1249 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांजवळ
India Corona Update : भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं डोकेदुखी वाढवली आहे. एक दिवसात हजारहुन अधिक प्रकरणे नोंदवली गेली असून सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे.
Coronavirus Cases Today : भारतात कोरोना विषाणू पुन्हा एकदा वेगाने हात-पाय पसरताना दिसत आहे. देशात पुन्हा एकदा हजारहुन अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आज 1249 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारहुन जास्त आहे. देशात आतापर्यंत एकूण कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या चार कोटींच्या पुढे गेली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजे शुक्रवारी कोरोना विषाणूचे 1249 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याआधी गुरुवारी देशात 1300 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज सापडलेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित घटली असली तरी, कोरोना रुग्णांची संख्या 1000 च्या पुढे असणं, ही एक चिंताजनक बाब आहे.
India Corona Update : कोरोना विषाणूनं डोकेदुखी वाढली
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 7,927 वर पोहोचली आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत देशात एकूण 4,47,00,667 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी चार कोटीहून अधिक कोरोना रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. तसेच 5 लाख 30 हजारहून अधिक रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे की, श्वास घेण्यास त्रास, ताप आणि खोकला 5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
India Corona Update : देशातील कोरोनाची आकडेवारी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (24 मार्च) नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्ये संसर्गामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यासह देशातील मृतांचा आकडा 5,30,813 वर पोहोचला आहे.
India Corona Update : देशात 92.07 कोटी कोविड चाचण्या
भारतात कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 1.19 टक्के आहे आणि साप्ताहिक कोरोना संसर्गाचा दर 1.14 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 7,927 सध्या कोरोना विषाणूवर उपचार केले जात आहेत, हे प्रमाण एकूण प्रकरणांपैकी 0.02 टक्के आहे. देशातील रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण 98.79 टक्के आहे. आतापर्यंत देशात 92.07 कोटी कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, यापैकी गेल्या 24 तासांत 1,05,316 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.
India Corona Update : कोरोना लसींचे 220.65 कोटी डोस
आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 4,41,61,922 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसींचे 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत.