3 जानेवारीपासून काँग्रेसचे 'जय बापू, जय भीम, जय संविधान' अभियान, जयराम रमेश यांची घोषणा
नवीन वर्षात 3 जानेवारीपासून काँग्रेस नवीन अभियानाला सुरुवात करणार आहे. काँग्रेस 3 जानेवारीपासून 'जय बापू, जय भीम, जय संविधान' हे अभियान सुरु करणार आहे.
Congress Campaign : नवीन वर्षात 3 जानेवारीपासून काँग्रेस नवीन अभियानाला सुरुवात करणार आहे. काँग्रेस 3 जानेवारीपासून 'जय बापू, जय भीम, जय संविधान' हे अभियान सुरु करणार आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसने जय बापू, जय भीम, जय संविधान अभियान सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र गुरुवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला आहे. त्यामुळं हे अभियान पुढे ढकलण्यात आले होते. आता ही मोहीम 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पक्ष 'जय बापू, जय भीम, जय संविधान' अभियान सुरू करणार असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली. बेळगावमध्ये 26 डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीनंतर ही मोहीम यापूर्वी सुरु होणार होती. परंतू गुरुवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर हे अभियान पुढे ढकलण्यात आले होते.
एक वर्षाची संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा काढण्यात येणार
प्रचाराचा एक भाग म्हणून मोर्चे आणि निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली आहे. 26 जानेवारीला डॉ. आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय 25 जानेवारी 2025 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीत काँग्रेसच्या वतीने एक वर्षाची संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा काढण्यात येमार आहे.
अमित शाहा यांच्या राजीनाम्याची मागणी
अमित शाह यांनी राज्यसभेत आंबेडकरांबाबत केलेल्या कथित वक्तव्यावर काँग्रेस सातत्याने हल्लाबोल करत आहे. ज्याबाबत भाजपने छेडछाड केल्याचा दावा केला आहे. भाजपने हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसवर राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.
डॉ.मनमोहन सिंह यांच्याबाबत बोलताना जयराम रमेश म्हणाले की, आज सत्तेत असलेले जे लोक आता डॉ.मनमोहन सिंग यांचे गुणगान करत आहेत त्यांनी त्यांची नम्रता, शांतता आणि क्षमतेचा विचार करायला हवा असे रमेश म्हणाले.
डॉ.मनमोहन सिंहांनी अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून केलेल्या कामामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मजबूत
विरोधी पक्षात असताना डॉ.मनमोहन सिंह क्वचितच बोलत होते. पण जेव्हा ते बोलत होते तेव्हा सर्वांनी त्यांचे ऐकले होते. लाल बहादूर शास्त्री यांच्याप्रमाणेच ते ते आजातशत्रू होते असे जयराम रमेश म्हणाले. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भाजपने त्यांच्या योगदानाला कमी लेखले होते असेही रमेश म्हणाले. अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मजबूत झाल्याचे रमेश म्हणाले.