Rahul Gandhi Truck Ride: बंगळूरमध्ये (Bengaluru) डिलिव्हरी बॉयसोबत प्रवास केल्यानंतर काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नुकतेच हरियाणामधील अंबालामध्ये ट्रक चालकासोबत प्रवास करतानाचं चित्र पाहायला मिळालं. तसेच ट्रक चालकासोबतचा राहुल गांधी यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. काँग्रेसचे नेते इम्रान प्रतापगढी यांनी देखील हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी फक्त राहुल गांधी हे करु शकतात.'
राहुल गांधी यांनी दिल्लीतून त्यांच्या ट्रकमधील प्रवासाला सुरुवात केली आणि ते शिमल्यासाठी निघाले होते. त्यांनी अंबाला येथून चंदीगडपर्यंत त्यांनी ट्रकमधून प्रवास केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधी यांचे कौतुक केले. तसेच हा व्हिडीओ सोमवारी रात्रीचा असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी आपल्या या प्रवासादरम्यान चालकांचे मुद्दे आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सुप्रिया श्रीनेत यांनी शेअर केला व्हिडीओ
काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी देखील राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी बसमधील सामान्य नागरिकांशी आणि मध्यरात्री ट्रक चालकांना भेटण्याचे कारण सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, 'राहुल गांधी यांना देशातील नागरिकांचे म्हणणे एकून घ्यायचे आहे, नागरिकांच्या अडचणी आणि समस्या त्यांना समजून घ्यायच्या आहेत. त्यांना असा करताना पाहून एक विश्वास निर्माण होतो,की कोणी तरी आहे जो लोकांसोबत उभा आहे. कोणी तरी आहे जो नागरिकांच्या चांगल्या भविष्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार आहे. कोणातरी आहे जो द्वेषाच्या बाजारात प्रेमाची दुकानं उघडत आहे.' असं म्हणत सुप्रिया श्रीनेत यांनी राहुल गांधी याचं कौतुक केलं आहे.
याआधी डिलिव्हरी बॉयसोबत केला होता प्रवास
राहुल गांधी सतत देशातल्या सामान्य लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळूरमध्ये एका डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटरवरुन प्रवास केला होता. त्यांचा हा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता.