Mallikarjuna Kharge : ईडीच्या रडारवर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे; 'या' प्रकरणात केली चौकशी
Mallikarjuna Kharge : काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीने चौकशी केली असल्याचे वृत्त आहे.
Mallikarjuna Kharge : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे ईडीच्या रडारवर आले आहेत. ईडीने खर्गे यांची चौकशी केली आहे. नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणात त्यांची ही चौकशी करण्यात आली आहे. सन 2012 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टासमोर ही तक्रार दाखल केली होती.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीनुसार, काही काँग्रेसी नेते यंग इंडियन लिमिटेडद्वारे (YIL) एसोसिएटेड जर्नल्सच्या अधिग्रहणात फसवणूक करणे आणि विश्वासघातात सहभागी होते. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची सुरुवात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. स्वामी यांनी या प्रकरणात सोनिया गांधी, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्या नावाचा उल्लेख केला होता.
फेब्रुवारी महिन्यात दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर आरोपींकडून उत्तर मागितले होते. न्या. सुरेश कैत यांनी गांधी कुटुंबाला नोटीस देताना अखिल भारतीय काँग्रेस महासचिव ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया यांनी 12 एप्रिलपर्यंत स्वामी यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला.
YIL च्या संचालक मंडळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधीदेखील आहेत. त्यांनी गैरमार्गाचा अवलंब करत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ठप्प असलेल्या प्रिंट मीडियाची संपत्ती हडपल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता.
दरम्यान, मागील काही वर्षांपासून भाजपच्या विरोधी नेत्यांची ईडीकडून चौकशी आणि अटकेची कारवाई सुरू आहे. भाजपकडून केंद्रीय संस्थांचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: