नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना आणि मोठ्या पक्षांपैकी एक अससेल्या काँग्रेसचा आज स्थापना दिवस आहे. पक्षाच्या स्थानपादिनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेस आज देशभर विरोध प्रदर्शन करणार आहे. देशभरातील विविध राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये 'संविधान बचाओ-भारत बचाओ' मार्चचं आयोजन करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज काँग्रेस मुख्यालयात सकाळी 9.15 वाजता झेंडा फडकवतील. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल. काँग्रेसचे सर्व राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकारी विविध राज्यांत आयोजित करण्यात आलेल्या आजच्या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत.


दिल्लीतील भारत बचाओ रॅलीच्या यशानंतर विविध राज्यात मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदी सरकारच्या धोरणांवर टीका आणि विरोध करण्याचा या मार्चचा उद्देश आहे. या मार्चदम्याम्यान काँग्रेसकडून अनेक मुद्द्यांवर आवाज उचलला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि दिल्लीतील जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीवर आवाज उठवला जाणार आहे.


प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये असणार


काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी काँग्रेस स्थापना दिनानिमित्त उत्तर प्रदेशमध्ये असणार आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये त्या उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस स्थापना दिवसानिमित्त लखनौमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रियांका गांधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. लखनौच्या काँग्रेस मुख्यालयात या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर प्रियांका गांधी पक्षाच्या सल्लागारांशी चर्चा करुन पक्षांची रणनितीवर चर्चा करणार आहेत.


देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरु आहेत. उत्तर प्रदेशमध्येही विविध ठिकाणी मोठी आंदोलने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात झाली. काही आंदोलनामध्ये हिंसाचारही झाला. या हिंसाचारादरम्यान अनेकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृत नागरिकांच्या कुटुंबियांना प्रियांका गांधी भेटणार आहेत. मात्र प्रियांका गांधीच्या अशा कार्यक्रमाची औपचारिक घोषणा झालेली नाही.


संबंधित बातम्या