नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सध्या थंडीची लाट पसरली आहे. दिल्लीतील थंडीने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीतील सफदरजंग परिसरात तापमानाचा पारा 2.4 अंश सेल्सिअसपर्यंत आला आहे. तर दिल्लीतील किमान तापमान 3.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 120 वर्षांत पहिल्यांदा डिसेंबर महिन्यात दिल्लीत एवढी थंडी पडली आहे. याआधी 1901 मध्ये डिसेंबर महिन्यात एवढी थंडी पडली होती.





तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता


दिल्लीत शुक्रवारी किमान 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जे सामान्य तापमानाच्या तीन अंश सेल्सिअसने कमी आहे. तर कमाल तापमान 13.4 अंश सेल्सिअस होतं, जे सामान्य तापमानाच्या सात अंश सेल्सिअसने कमी आहे. यंदाच्या मोसमातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. आज, उद्या या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. डिसेंबर महिन्यातील दोन दशकातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. याआधी 1997 साली पहिल्यांदा दिल्लीकरांनी एवढ्या थंडीचा अनुभव घेतला होता.


गेल्या 120 वर्षांत केवळ चारच वेळा कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस खाली


गेल्या 120 वर्षांत केवळ चार वेळा डिसेंबरमधील कमाल तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. डिसेंबर महिन्यातील कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी 1919, 1929, 1961 आणि 1997 मध्ये दिल्लीकरांनी अनुभवलं होतं. दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी कमाल तापमान 19.85 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत कडाक्याची थंडी पसरली आहे. आधी 1997 मध्ये सलग 13 दिवस अशी कडाक्याची थंडी पडली होती.


पुढील आढवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता


पुढील आठवड्यात वाऱ्याची दिशा बदल्यास हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीकरांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. थंडी आणि दाट धुक्यामुळे हवामान विभागाने 29 डिसेंबरपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.