नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतल्या रामलीला मैदानात काँग्रेसने भारत बचाव रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीदरम्यान घेतलेल्या सभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. सोनिया गांधी म्हणाल्या की, मोदी-शाह सरकारने संविधानाचा अपमान केला आहे. त्यांना देश चालवण्यासाठी संसद आणि संविधानाची गरज नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. देशात अंधेर नगरी चौपट राजा अशी स्थिती आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, आज देशातला तरुण बेरोजगार आहे. नोकरी मिळवण्यासाठी तो भटकतोय. गेल्या दशकांमध्ये अशी परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती. परंतु आता खूपच वाईट परिस्थिती आहे. बेरोजगारीमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. देशभरात महागाई खूप वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सामन्यांना जगणं मुश्किल होत आहे.

देशाची परिस्थिती खूप गंभीर आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. तुम्हीदेखील घराबाहेर पडा, आंदोलन करा. आपल्याला देश वाचवायचा आहे. त्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल.

सोनिया म्हणाल्या की, मी जेव्हा शेतकरी बांधवांची अवस्था पाहते तेव्हा खूप त्रास होतो. त्यांना आपल्या शेतात योग्य वेळी पेरणीसाठी बियाणे मिळत नाहीत, त्यांना सहज खत मिळत नाही. पाणी आणि वीज उपलब्ध नाही. पिकांना हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी पिचला आहे.

दुसऱ्या बाजूला कामगारांची अवस्थादेखील अशीच आहे. ते दिवसभर मजुरीमध्ये गुंतलेले असतात. ते पावसाळा, हिवाळा, उन्हाळ्याची पर्वा न करता काम करत राहतात. तरीही त्यांना 2 वेळची भूक भागवण्यासाठीचं अन्नधान्य खरेदी करता येत नाही.


देशाची अर्थव्यवस्था उध्वस्थ झाली आहे. मोदी सरकारची चुकीची धोरणं त्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे छोटे व्यापारीदेखील उद्ध्वस्त झाले आहेत. नवउद्योजक, व्यापाऱ्यांना कर्ज देण्यास बँका सक्षम नाहीत. नोकरी आणि पैशांअभावी संपूर्ण कुटुंबांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. परंतु ही परिस्थीती बदलण्यासाठी आपण एकत्र येऊन आंदोलन करायला हवे.