नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मंदी, वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारचा विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून आज (14 डिसेंबर) नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर भारत बचाव रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीदरम्यान केलेल्या भाषणांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, कांग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं.


प्रियांका गांधी म्हणाल्या की, आम्ही देशाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. भारत प्रेम आणि बंधुतेच्या आधारावर बनला आहे. या देशात सर्वांना समानतेने वागवले जाते. परंतु काही लोक ही परिस्थिती बदलू पाहात आहेत. परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज देशात सर्वत्र, भिंतींवर, होर्डिंग्सवर अथवा वृत्तपत्रात लिहिलेलं पाहायला मिळतं की, 'मोदी है तो मुमकिन है', हे खरं आहे. मोदी आहेत म्हणूनच देशात महागाई आहे. 100 रुपये किलो कांदा आहे, मागील चार दशकांमधील सर्वाधिक बेरोजगारी आहे. मोदी आहेत म्हणून देशातले चार कोटी तरुण बेरोजगार आहेत, 15 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. देशातील मुली आणि महिला सुरक्षित नाहीत. याला भाजप जबाबदार आहे. भाजपपासून देशाला वाचवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल.