दिग्विजय सिंहांच्या 'सर्जिकल स्ट्राईक' संदर्भातील त्या वक्तव्यावर काँग्रेसने हात झटकले; काँग्रेस म्हणतेय, ते त्यांचे वैयक्तिक विचार...
Congress digvijay singh on surgical strike : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भाने केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने हात झटकले आहेत.
Congress digvijay singh on surgical strike : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्ट्राईकच्या संदर्भाने केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने हात झटकले आहेत. सिंह यांनी म्हटलं होतं की, केंद्र सरकार सतत सर्जिकल स्ट्राईक करण्याबाबत बोलत असते, मात्र त्यात किती लोक मारले गेले याचा कोणताही पुरावा नाही. या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलेले विचार त्यांचे व्यक्तिगत विचार आहेत. काँग्रेस पक्षाचा याच्याशी काही संबंध नाही. 2014 पूर्वी यूपीए सरकारने सर्जिकल स्ट्राईक केले होते. काँग्रेसने राष्ट्रीय हितासाठी सर्व लष्करी कारवाईला पाठिंबा दिला आहे आणि यापुढेही राहील, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते दिग्विजय सिंह
यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं होतं की, केंद्र सरकार सतत सर्जिकल स्ट्राईक करण्याबाबत बोलत असते, मात्र त्यात किती लोक मारले गेले याचा कोणताही पुरावा नाही. राहुल गांधी द्वेषाचे बोलून देशाची बदनामी करत असल्याचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणतातय मात्र त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकावे. ते उघडपणे लोकांना मारण्याच्या गप्पा मारत द्वेष पसरवत आहेत, असंही दिग्विजय सिंहांनी म्हटलं होतं.
दिग्विजय सिंह यांनी म्हटलं होतं की, कलम 370 रद्द केल्याचा फायदा कोणाला झाला. दहशतवाद संपेल आणि हिंदूंचे वर्चस्व राहील, असे केंद्राकडून सांगण्यात आले. पण परिस्थिती वेगळी आहे. कलम 370 हटवल्यापासून दहशतवाद वाढला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये रोज काही ना काही घडत आहे. पूर्वी दहशतवादी घटना खोऱ्यापुरत्या मर्यादित होत्या, मात्र आता त्या राजोरी, डोडापर्यंत पोहोचल्या आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं.
भारतीय लष्कर सर्जिकल स्ट्राईकबद्दल पुरावे देण्यास बांधील नाही -माजी आयएएफ अधिकारी निवृत्त विंग कमांडर प्रफुल्ल बक्षी
भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल पुरावे देण्यास बांधील नाही, असे माजी आयएएफ अधिकारी निवृत्त विंग कमांडर प्रफुल्ल बक्षी यांनी म्हटलं आहे. सरकारला हे माहित आहे की हल्ल्याचे तपशील शेअर करणे हे चुकीचे आहे. हे लष्कराचे धोरण आहे. याबाबत जर काँग्रेसला पुरावा पहायचा असेल तर पक्षाने पाकिस्तानींना विचारले पाहिजे, असं देखील बक्षी म्हणाले.
ANI शी बोलताना बक्षी म्हणाले, लष्कर कोणताही पुरावा देत नाही. कोणता पुरावा द्यायचा आणि का? तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर पाकिस्तानींना विचारा. जर ते तुमचे मित्र असतील तर ते तुम्हाला सांगतील. लष्कराला पुरावे देण्यासाठी कोणीही सक्ती करू शकत नाही. सरकारला पुरावे द्यायचे असतील तर देऊ शकतात. पण ते लष्कराच्या धोरणाच्या विरोधात असेल हे सरकारलाही माहीत आहे. कोण काय म्हणतो याने काही फरक पडत नाही, असं बक्षी म्हणाले.