Congress News : काँग्रेसच्या चिंतन शिबिरात मोठ्या सुधारणांची घोषणा, राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची मागणी, पाहा 10 महत्त्वाचे मुद्दे
काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशी काँग्रसची भविष्यातील वाटचाल कशी असेल याबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. तसेच यावेळी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनीही मार्गदर्शन केले.
Congress News : राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसचे तीन दिवसांचे चिंतन शिबिर पार पडले. काल त्या शिबिराची सांगता झाली. शिबिराच्या शेवटच्या दिवशी काँग्रसची भविष्यातील वाटचाल कशी असेल याबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. यासोबतच हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार निशाणा लगावला. तसेच राहुल गांधी यांना पुन्हा एकदा अध्यक्ष करण्याची मागणी चिंतन शिबिरात करण्यात आली आहे. पाहुयात काँग्रेसच्या चिंतन शिविरबद्दल 10 महत्त्वाच्या गोष्टी...
1) तीन दिवसीय चिंतन शिबिराच्या समारोपात काँग्रेसने पक्षात मोठ्या सुधारणा जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने तरुणांची पक्षातील भूमिका वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. पक्षात एक कुटुंब एक तिकीट हे सूत्र राबवणे, संघटनेत प्रत्येक स्तरावर तरुणांना 50 टक्के प्रतिनिधित्व देणे. आगामी लोकसभा निवडणुकीपासून 50 टक्के तिकिटे 50 वर्षांखालील व्यक्तींना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
2) या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांना पुन्हा एकदा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची मागणीही करण्यात आली. याठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी लॉबिंग केले. त्यानंतर राहुल म्हणाले की, पक्ष जे म्हणेल ते मी करेन. राहुल यांच्या या विधानानंतर ते लवकरच पुन्हा पक्षाचे अध्यक्ष होऊ शकतात, असे मानले जात आहे.
3) चिंतन शिबिराच्या समारोपात काँग्रेसतर्फे 'उदयपूर नवसंकल्प' प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये राजकीय समस्या, संघटनात्मक समस्या, पक्षांतर्गत सुधारणा, दुर्बल घटक, तरुण, विद्यार्थी आणि आर्थिक समस्यांवर भर देण्यात आला आहे. तसेच, पुढे काय करायचे हे देखील स्पष्टपणे नमूद केले आहे.
4) काँग्रेसने समविचारी राजकीय पक्षांशी संपर्क प्रस्थापित करण्याचे वचन दिले आहे. राजकीय परिस्थितीनुसार युतीचा पर्याय खुला ठेवला असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर अर्थव्यवस्था, महागाई आणि बेरोजगारी या मुद्यवरुन कडाडून टीका केली. सध्याची जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती पाहता 30 वर्षांच्या उदारीकरणानंतर ही गरज निर्माण झाली आहे. आता देशाची आर्थिक धोरणे बदलली पाहिजेत असेही या शिबिरात सांगण्यात आले.
5) पक्षातील मोठ्या सुधारणांच्या उपाययोजनांच्या घोषणेदरम्यान, राहुल गांधी यांनी कबूल केले की पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे. हा दुवा पूर्ववत करण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागेल आणि घाम गाळावा लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.
6) पक्षाच्या नेत्यांना उद्देशून राहुल गांधी म्हणाले की, हे एक कुटुंब आहे आणि मी तुमच्या कुटुंबातील आहे. माझा लढा देशासाठी धोकादायक असलेल्या आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीविरुद्ध आहे. हे लोक द्वेष पसरवणारे, हिंसाचार पसरवणारे आहेत. यांच्या विरोधात मी लढतोय, हा माझ्या आयुष्याचा लढा असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
7) चिंतन शिबिराच्या समारोपाच्या निमित्ताने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीतील काही सदस्यांसह त्यांच्या अंतर्गत सल्लागार गट स्थापन करण्याची घोषणा केली. हा सामूहिक निर्णय घेणारा गट नसल्याचंही स्पष्ट केलं.
8) सोनिया गांधी म्हणाल्या की, एक व्यापक टास्क फोर्स तयार केला जाईल, जो अंतर्गत सुधारणांची प्रक्रिया पुढे नेईल. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सुधारणा केल्या जातील आणि त्यामध्ये संघटनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल.
9) काँग्रेसने 'पब्लिक इनसाइट डिपार्टमेंट', 'नॅशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' आणि 'इलेक्शन मॅनेजमेंट डिपार्टमेंट' आणि स्थानिक पातळीवर मंडल समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
10) 'भारतीय राष्ट्रवाद' हे काँग्रेसचे मुख्य वैशिष्ट्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या 'ध्रुवीकरणाच्या राजकारणाची' धार बोथट करण्यासाठी आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी यावर्षी 2 ऑक्टोबरपासून 'भारत जोडो यात्रा' काढली जाईल.