(Source: ECI/ABP News/ABP Majha)
G20 Summit in Delhi: भारतात होणाऱ्या जी-20 परिषदेकडे चीनची पाठ? राष्ट्रपती शी जिनपिंग अनुपस्थित राहणार असल्याचा दावा
G20 Summit in Delhi: राजधानी दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यात जी -20 परिषद पार पडणार आहे. ही बैठक 8 ते 10 सप्टेंबरपर्यंत पार पडणार आहे.
नवी दिल्ली : भारतात (India) होणाऱ्या जी -20 या शिखर परिषदेसाठी चीनचे (China) राष्ट्रपती शी जिनपिंग सहभागी होणार नाहीत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने जिनपिंग हे जी-20 परिषदेमध्ये सामील होणार नसल्याचं वृत्त दिलं आहे. रॉयटर्सने त्यांच्या या वृत्तामध्ये चीनमधील एका राजकीय नेत्याचा आणि काही भारतीय अधिकाऱ्यांचा हवाला दिला आहे.
प्रीमियर ली कियांग यांना बिजिंगचे प्रतीनिधी म्हणून भारतात होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी पाठवण्यात येणार असल्याचं देखील या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे जी-20 परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याची अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन होणार सहभागी
भारतात होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देखील उपस्थित राहणार आहेत. परंतु जिनपिंग यांच्या उपस्थितीविषयी सुरुवातीपासूनच शंका व्यक्त केली जात होती. पण आता ते या बैठकीमध्ये सामील होणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. या परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. तैवानबाबत अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात होती.
भारताच्या अरुणाचल प्रदेशाला चीनच्या नकाशावर दाखवल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. पण आता ते या परिषदेसाठी हजर राहणार नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून त्याची उत्तर या परिषदेमध्ये मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारतात जी-20 परिषदेचं आयोजन
भारतात 8, 9 आणि 10 तारखेला जी -20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने राजधानी दिल्लीमध्ये जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. दरम्यान या परिषदेसाठी रशियाचे राष्ट्रपती पुतिन हे उपस्थित राहणार नाहीत. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन करुन कळवले आहे. या बैठकीसाठी 20 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
जी 20 शिखर परिषदेसाठी भारतात येणारे 6 देश... अमेरिका, चीन, तुर्की, फ्रान्स, यूएई, आणि युरोपियन युनियन हे आपापल्या गाड्यांचा ताफा विमानानं भारतात घेऊन येणार आहेत. त्यामुळे भारतात होणाऱ्या या परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे जागतिक राजकारणाच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.