(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अखेर चीनने अरुणाचलमधील बेपत्ता तरूण भारताकडे सोपवला
India China : चीनच्या लष्कराने अरुणाचल प्रदेशमधील तरुणाला भारतीय लष्कराकडे अखेर आज सुपूर्द केले. या तरुणाने चीनने अपहरण केले असल्याचा आरोप करण्यात येत होता.
Arunachal Pradesh Missing Boy : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेल्या तरुणाला भारतीय लष्कराकडे सुपूर्द केले आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी गुरुवारी ही माहिती दिली. अरुणाचल प्रदेशमधील अपर-सियांग जिल्ह्यातील जिदो गावातील रहिवासी 19 वर्षीय मिराम तारोन हा युवक बेपत्ता झाला होता. चीनच्या सैनिकांनी त्याचे अपहरण केला असल्याचा दावा स्थानिकांनी केला होता.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले की, चीनच्या पीएलएने मिरोम तारोन या युवकाला भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले आहे. वैद्यकीय व इतर प्रक्रिय पूर्ण झाल्यानंतर या युवकाला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहे. याआधी बुधवारी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये हॉटलाइनवर चर्चा झाली. यावेळी चिनी सैन्याने सकारात्मक भूमिका घेत युवकाला भारताच्या ताब्यात देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर या युवकाला भारतीय लष्कराकडे सोपवण्यासाठीचे ठिकाण निश्चित करण्यात आले.
अरुणाचलमधून चिनी सैन्याने भारतीय युवकाचे अपहरण केल्याचा आरोप झाल्यानंतर खळबळ उडाली होती. विरोधी पक्षांनी या युवकाची तातडीने सुटका करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावरून वाद सुरू आहे. चीनकडून अक्साई चीनसह अरुणाचल प्रदेशवर दावा केला जातो. अरुणाचल प्रदेश हा आपला भूभाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येतो.