मुंबई : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) काही वेळातच चंद्रावर उतरणार आहे. भारताची चांद्रयान मोहिम इतिहास घडवणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष इस्रोच्या चांद्रयान-3 कडे आहे. इस्रोकडून चांद्रयान-3 लँडिंगची (Chandrayaan-3 Moon Landing) तयारी पूर्ण झाली आहे. आता एकच ध्यास आहे, तो म्हणजे चंद्रावर लँडिंग. इस्रोकडून कमांड सेंटरमधील तयारीचे फोटो ट्विट करण्यात आला आहे. विक्रम लँडर मोड्युलला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया संध्याकाळी 5.44 पासून सुरू होणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. त्यानंतर पुढे 20 मिनिटांनी टच डाऊन होणं अपेक्षित आहे. 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्रावर उतरेल. विक्रम लँडरच्या सगळ्या सिस्टीम उत्तम पद्धतीनं काम करतायत अशी माहिती इस्रोनं दिली आहे.


भारताची चांद्रयान मोहिम इतिहास घडवणार


चांद्रयान-3 सध्या चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे. सध्या चांद्रयान-3 चंद्रापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. येथून पुढे त्याचा वेग आणि उंची कमी-कमी होत जाईल आणि चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. महत्त्वाचं म्हणजे ज्या टप्प्यात चांद्रयान-2 मोहिमेला अपयश आलं होतं, त्याचं अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आता चांद्रयान-3 आहे. ऑटोमॅटिक लँडिंग सिक्वेन्स (ALS) हा विक्रम लँडर मॉड्यूल (LM) मध्ये आधीच लोड केलेली सूचनांची मालिका आहे. या क्रमाने चांद्रयान-3 चं लँडिंग होईल. लँडिंगच्या सुमारे 2-3 तास आधी चंद्राच्या पृष्ठभागापासूनचे अंतर, लँडिग करण्याचे ठिकाण तेथी हवामान यांच्यावरून निष्कर्ष काढला जाईल आणि त्यानंतरच लँडिंगचा निर्णय घेतला जाईल.


Chandrayaan-3 Landing Sequence : लँडिंगचा क्रम कसा असेल? 



  • चांद्रयान-3 ची चंद्रापासून उंची 30 किमी आहे. 

  • चांद्रयान-3 चा चंद्राच्या जमिनीपर्यंत खाली उतरताना एकूण 745.5 किमी प्रवास होणार आहे. कारण चांद्रयान सरळ रेषेत खाली उतरणार नाही. 

  • एकूण 4 टप्प्यात चांद्रयान-3 चा चंद्राच्या जमिनीपर्यंतचा प्रवास विभागला गेला आहे.

  • रफ ब्रेकिंग फेज, ॲटिट्यूड होल्ड फेज, फाइन ब्रेकिंग फेज आणि टर्मिनल डिसेंट फेज


चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास


भारताची चांद्रयान-3 ही मोहीम आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. इस्रो (ISRO) चं हे यान काही तासात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. याआधी चंद्रयान-1 मोहिमेतला इम्पॅक्ट प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशातच धडकला होता. चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान विक्रम लँडरनं या प्रदेशात उतरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इस्रोचं चांद्रयान-3 दक्षिण ध्रुवावर वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे. 


चांद्रयान-3 चं लँडिंग पुढे ढकलणार?


चांद्रयान-3 विक्रम लँडर कॅमऱ्याद्वारे लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधत आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत एक मोठी माहिती दिली आहे. अनुकूल वातावरण नसल्याचं चांद्रयान-3 चं लँडिंग पुढे ढकलण्यात येईल. लँडर मॉड्यूलशी संबंधित कोणतेही घटक प्रतिकूल दिसल्यास, 23 ऑगस्टला लँडिंग होणार नाही. लँडिंगसाठी पोषक वातावरण नसल्यास लँडिंग 27 ऑगस्टला केलं जाईल, असं इस्रोने सांगितलं.