Mizoram Railway Bridge Collapse: मिझोरामची (Mizoram News) राजधानी ऐझॉलजवळ (Aizawl) निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्यानं (Railway Bridge Collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, असंही सांगितलं जात आहे.
मिझोरामच्या रेल्वे ओव्हर ब्रिज प्रकल्पावर हे मजूर काम करत होते. दुर्घटनाग्रस्त पुल क्रमांक 196 ची उंची 104 मीटर आहे. हा पूल दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा उंच आहे. या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर मिझोराम देशाच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडलं जाईल, असा दावा प्रशासनानं केला आहे. पण या पुलाचं काम पूर्ण होऊन तो सुरू होण्यापूर्वीच तो दुर्घटनेला बळी पडला आहे.
दुर्घटनास्थळी अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी सकाळी हा अपघात झाला तेव्हा जवळपास 40 मजूर घटनास्थळी उपस्थित होते. कुरुंग नदीवर बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या रेल्वे पुलाचं काम सुरू होतं. दुर्घटनास्थळ ऐझॉलपासून 21 किमी अंतरावर आहे.
मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थनाही केली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना मदत देणार असल्याचीही घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयानं (PMO) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर पोस्टही केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी मी प्रार्थना करतो."
"दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.", असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.