ISRO Chandrayaan-3 : भारताचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) अवघ्या काही तासांत चंद्रावर उतरणार आहे. इस्रोचा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न आहे. पृथ्वीवरून 14 जुलै रोजी निघालेलं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी चंद्रवर उतरेल. चांद्रयान-3 संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चंद्रावर उतरण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असेल. ही चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर पाऊल ठेवणार भारत चौथा देश ठरेल.
चांद्रयान-3 रचणार इतिहास
चांद्रयान-3 चं एकूण वजन 3900 किलो आहे. चांद्रयान-3 मोहिमेद्वारे भारताचा दुसऱ्यांदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न आहे. याआधीच्या दुसऱ्या मोहिमेत चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलं होतं. चांद्रयान-3 साठी तसेच इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेसाठी एकूण किती खर्च आला आहे, हे जाणून घ्या.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश
भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरेल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया 05 वाजून 47 मिनिटांनी सुरु होईल आणि 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान3 चंद्रावर उतरेल. भारताची चंद्रमोहिम ही जगातील सर्वात स्वस्त चंद्रमोहिम आहे. भारताच्या चंद्रमोहिमेचा खर्च इतर देशांच्या तुलनेने फार कमी आहे. इस्रोच्या चंद्र मोहिमेचा एकूण किती खर्च हे जाणून घ्या.
ISRO Moon Mission Budget : चंद्रमोहिमेसाठीचा एकूण खर्च
Chandrayaan-1 Budget : चांद्रयान-1 मोहिमेचा खर्च
चांद्रयान-1 चंद्र मोहिमेचा खर्च 386 कोटी रुपये होता. चांद्रयान-1 हे 22 ऑक्टोबर 2008 रोजी लाँच करण्यात आलं होतं. ही मोहिम यशस्वी ठरली होती. चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंगसाठी हे यान चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर चंद्राभोवती फिरत होतं. ही माहितीचा पुढील चंद्र मोहिमेसाठी उपयुक्त ठरली.
Chandrayaan-2 Budget : चांद्रयान मोहिमेचा खर्च
इस्रोने 22 जुलै 2019 रोजी त्यांची दुसऱ्या चंद्र मोहिमेत चांद्रयान-2 लाँच केलं होतं. भारताच्या दुसऱ्या चंद्र मोहिमेचा एकूण खर्च सुमारे 124 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 850 कोटी रुपये होता. यामध्ये प्रक्षेपणासाठी 123 कोटी रुपये आणि उपग्रहासाठी 637 कोटी रुपये या खर्चाचा समावेश आहे. ही जगातील सर्वात स्वस्त चंद्र मोहिमांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले. दुसर्या चंद्र मोहिमेची किंमत हॉलीवूडच्या ब्लॉकबस्टर अॅव्हेंजर्स एंडगेमच्या बजेटपेक्षा निम्म्याहून कमी होती. अॅव्हेंजर्स एंडगेम चित्रपटाचं अंदाजे बजेट 356 दशलक्ष डॉलर आहे. दरम्यान, चांद्रयान-2 मोहिम अयशस्वी ठरली होती. चंद्रावर लँडिंगपूर्वी 400 मीटर अंतरावर इस्रोचा लँडरशी संपर्क तुटल्याने चांद्रयान 2 मोहिम अयशस्वी ठरली.
Chandrayaan-3 Budget : चांद्रयान 3 मोहिमेचा खर्च किती?
चांद्रयान 3 मोहिमेसाठी सुमारे 600 कोटी रुपयांहून अधिक खर्च आला आहे. महत्त्वाचं म्हणजे भारताच्या चंद्रमोहिमेचा खर्च इतर सर्व देशांच्या तुलनेने फार कमी आहे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी चांद्रयान-2 च्या तुलनेनं कम खर्च आला आहे. कारण, चांद्रयान-3 मधून फक्त लँडर आणि रोव्हर हे अवकाशात पाठवण्यात आलं आहे. याआधी प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा वापर चांद्रयान-3 मोहिमेत करण्यात येणार असल्याने चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आलेलं नाही. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा चांद्रयान-3 सोबत संपर्क झालेला आहे. त्यामुळे या मोहिमेत आता चांद्रयान-2 चीही मदत होणार आहे. चांद्रयान-2 मोहिमेसाठी 960 कोटी रुपये खर्च आला होता. तर चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाचा खर्च सुमारे 75 कोटी आहे.
चांद्रयान-3 मोहिम कशी आहे?
चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन म्हणजे पुढील टप्पा आहे. चांद्रयान-3 मध्ये लँडर आणि रोव्हर पाठवण्यात आला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करेल. त्यानंतर विक्रम लँडरमधील रोव्हर तेथील पाण्याचे साठे शोधणे आणि चंद्रावरील माती आणि दगड यांची नमुने आणि इतर आवश्यक माहिती गोळा करेल. चांद्रयान 3 च्या लँडरचं नाव विक्रम (Vikram) आणि रोव्हरचं नाव प्रज्ञान (Pragyan) आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :