मुंबई : अवघ्या काही तासांत भारत (India Moon Mission) नवा इतिहास रचणार आहे. अवघ्या काही तासांत चंद्रावर तिरंगा फडकेल. इस्रोचं (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये यश मिळाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. त्यासोबत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरेल. अवघ्या जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे लागलं आहे. 


3.84 लाख किलोमीटरचा प्रवास


चांद्रयान-3 ने 14 जुलै 2023 पासून पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी चांद्रयान-3 ला 40 दिवस लागले आहेत. हा प्रवास नेमका कसा होता, याबाबत सविस्तर जाणून घ्या.


चांद्रयान-3 चा 40 दिवसांचा प्रवास कसा होता?


5 जुलै : चांद्रयान-3 ला अंतराळात नेणाऱ्या LVM-3 रॉकेटशी जोडण्यात आलं. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात प्रक्षेपणाची तयारी सुरू झाली.


6 जुलै : इस्रो (ISRO) ने मिशन चांद्रयान-3 चं प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली. 


11 जुलै : चांद्रयान-3 ची 'लाँच रिहर्सल' करण्यात आली. इस्रोकडून चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण करण्यात आली.


14 जुलै : लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-3) म्हणजेच 'बाहुबली रॉकेट' (Bahubali Rocket) द्वारे चांद्रयान-3 चं श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 2.35 वाजता यशस्वी प्रक्षेपण पार पडलं.


15 जुलै : LVM 3-M4 रॉकेटने चांद्रयान-3 योग्य कक्षेत पोहोचवलं. चांद्रयान-3 ने  41762 किमी x 173 किमीची कक्षा गाठली. चांद्रयान-3 ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला.


17 जुलै : चांद्रयान-3 41603 किमी x 226 किमीच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचलं.


22 जुलै : चांद्रयान-3 ने चौथ्या कक्षेत प्रवेश केला. अंतराळयान 71351 किमी x 233 किमीच्या कक्षेत पोहोचलं.


25 जुलै : चांद्रयान-3 ला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी बुस्टिंग करण्यात आलं. निर्धारित वेळेत चांद्रयान-3 चं इंजिन चालू करण्यात आले. त्यानंतर या यानाला पुरेसा वेग देऊन त्याला चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आलं. 


1 ऑगस्ट : चांद्रयान-3 ट्रान्सलुनर कक्षेत (288 किमी x 369328 किमी) पोहोचलं.


5 ऑगस्ट : चांद्रयान-3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत (164 किमी x 18074 किमी) प्रवेश केला.


6 ऑगस्ट : अखेर चंद्राचं दर्शन झालं! चांद्रयान-3 यानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला.


6 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत दाखल झालं. 6 ऑगस्ट 2023 रोजी यान 170 x 4313 किमी कक्षेत पोहोचलं.


9 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं. चांद्रयान-3 ने 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.40 वाजता कक्षा बदलली.


10 ऑगस्ट : चांद्रयान-3 ने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो पाठवले.


14 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागाजवळ पोहोचलं. यानाने 150 किमी x 177 किमीवर चौथ्या कक्षेत प्रवेश केला.


16 ऑगस्ट : अंतराळयानाने 163 किमी x 153 किमीची चंद्राची पाचवी आणि अंतिम कक्षा गाठली.


17 ऑगस्ट : चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आहे.


18 ऑगस्ट : चांद्रयान3 चंद्राच्या 113 किमी x 157 किमी कक्षेत पोहोचलं. विक्रम लँडरचा वेग कमी करण्याची डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. चांद्रयान-3 चंद्रापासून 30 किमी अंतरावर पोहोचलं.


20 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या 134 किमी x 25 किमी कक्षेत पोहोचण्यासाठी डिबूस्टिंग प्रक्रियेद्रवारे विक्रम लँडरचा वेग पुन्हा कमी करण्यात आला आणि चांद्रयान-3 चंद्रापासून 25 किमी अंतरावर पोहोचलं.


21 ऑगस्ट : चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 चा एकमेकांशी संपर्क झाला. इस्रोची चांद्रयान-2 मोहिम अयशस्वी ठरली तरी, चांद्रयान-2 चं ऑर्बिटर अद्यापही अवकाशात चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे.


23 ऑगस्ट : चांद्रयान-3 चा वेग आता हळूहळू कमी होत आहे. चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करेल.


भारत या मोहिमेत यशस्वी ठरल्यास चंद्रावर पोहोचणार चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल.


महत्वाच्या इतर बातम्या :


Moon Mission : 70 वर्षात 111 वेळा प्रयत्न, यश फक्त 8 वेळा; जगभरातील चंद्रमोहिमांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे?