Chandrayan-2 | चांद्रयान- 2 ने पाठवलेल्या दुसऱ्या फोटोत दिसले चंद्रावरील खड्डे
चांद्रयान-2 ने हे फोटो 23 ऑगस्ट रोजी टेरेन मॅपिंग कॅमेऱ्याच्या मदतीने घेतले आहेत. जवळपास 4375 किमी उंचीवरुन हे फोटो घेण्यात आले आहे.
बंगळुरु : चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर सध्या चंद्राभोवती घिरट्या घालत आहे. यादरम्यान चांद्रयान-2 ने चंद्राचे काही फोटो काढले आहेत. ज्यामध्ये चंद्रावर मोठे खड्डे पाहायला मिळत आहेत. इस्रोने या खड्डांची नावंही सांगितली आहेत. सोमरफेल्ड, किर्कवुड, जॅक्सन, मॅक, कोरोलेव्ह, मित्रा, प्लासकेट, रोझदेस्तवेंस्की आणि हर्माइट अशी या खड्ड्यांची नावं आहेत.
प्रसिद्ध वैज्ञानिक, अतंराळवीर, भौतिकशास्त्रज्ञ आणि अंतराळ प्रवाशांच्या नावावरुन या खड्ड्यांची नावं ठेवण्यात आली आहेत. यामधील एका मोठ्या खड्ड्याचं नाव 'मित्रा' आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ पद्मभूषण प्रोफेसर शिशीर कुमार मित्रा यांच्यानावावरून हे नाव देण्यात आलं आहे. प्रोफेसर मित्रा यांना आयनमंडल आणि रेडिओफिजिक्स या क्षेत्रातील योगदानाबद्दल ओळखलं जातं.
#ISRO Lunar surface imaged by Terrain Mapping Camera-2(TMC-2) of #Chandrayaan2 on August 23 at an altitude of about 4375 km showing craters such as Jackson, Mach, Korolev and Mitra (In the name of Prof. Sisir Kumar Mitra) For more images please visit https://t.co/ElNS4qIBvh pic.twitter.com/T31bFh102v
— ISRO (@isro) August 26, 2019
चांद्रयान-2 ने हे फोटो 23 ऑगस्ट रोजी टेरेन मॅपिंग कॅमेऱ्याच्या मदतीने घेतले आहेत. जवळपास 4375 किमी उंचीवरुन हे फोटो घेण्यात आले आहे. चांद्रयान-2 ने चंद्राचा पहिला फोटो 22 ऑगस्ट रोजी घेतला होता.
22 जुलै रोजी चांद्रयान-2 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे लॉन्च करण्यात आलं होतं. चांद्रयान 2 ला तीन भागात विभागण्यात आलं आहे. पहिला भाग ऑर्बिटर आहे, जो चंद्राच्या कक्षेत राहिल. दुसरा भाग लॅण्डर ज्याचं नाव आहे विक्रम, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तर तिसरा भाग आहे प्रग्यान जो रोव्हर असून तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत राहिल.
चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून येत्या 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे, अशी माहिती इस्रोने दिली.