मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या योजनेची घोषणा केली होती. आता, केंद्र सरकारने 2005 पासून पुढील 6 वर्षांसाठी या योजनेस मंजुरी दिली आहे.

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना (Farmer) पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता कधी मिळणार याची उत्सुकता असतानाचा आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये (Cabinet) पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. 24 हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या, विविध 36 योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धन-धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती, केंद्रीय प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या योजनेमुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तत्पूर्वी, यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या योजनेची घोषणा केली होती. आता, केंद्र सरकारने 2005 पासून पुढील 6 वर्षांसाठी या योजनेस मंजुरी दिली आहे.
पिकांच्या कापणीनंतर साठवण क्षमता वाढविण्याच्या कामात या योजनेचं मोठं योगदान असणार आहे. पेरणीच्या सुविधांमध्येही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. या योजनेच्या माध्यमातून 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.
पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी काय आहे?
पीएम धन धान्य कृषी योजनेअंतर्गत देशाभरातील 100 जिल्ह्यांची निवड केली जाणारं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये उत्पादकता कमी आहे, त्यांचा या 100 जिल्ह्यांमध्ये समावेश केला जाईल. शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या विविध 36 योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर यात भर दिला जाईल. राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जाईल. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशभरातल्या एकूण 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणारं आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं, बी-बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाईल. यासोबतच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल? यावरही काम केलं जाईल.
शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार?
योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित केलं जाईल. पिकाची साठवणूक तसेच सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल. सोबतच उच्च गुणवत्ता असलेले बी-बियाणे शेतकऱ्यांना पुरवले जातील. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा पुरवठा केला जाईल. सोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी पंप आदी उपकरणं घेण्यासाठीही अर्थसहाय्य केले जाईल. याच योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. ग्रामीण क्षेत्रात रोजगाराची संधी कशी वाढेल, याकडे लक्ष दिले जाईल. यामुळेच आगामी काळात शेती क्षेत्रात बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#Cabinet approves 'Prime Minister Dhan-Dhaanya Krishi Yojana'
— Dhirendra Ojha (@DG_PIB) July 16, 2025
Scheme aims to enhance agricultural productivity, increase crop diversification and sustainable agricultural practices, augment post-harvest storage, improve irrigation facilities and facilitate availability of credit pic.twitter.com/YZOSo6evze
पंतप्रधान धनधान्य कृषी योजना मुख्य ठळक मुद्दे
पीएम धनधान्य कृषी योजनेच्या मुख्य ठळक वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
- लक्ष्यित कृषी विकास: सरकारने कमी उत्पादकता, मध्यम पीक वाढ आणि देशभरात मर्यादित कर्ज उपलब्धता असलेले १०० जिल्हे ओळखले आहेत - ही योजना १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत करेल.
- शाश्वत आणि हवामान-प्रतिरोधक शेती: हा उपक्रम उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान-विशिष्ट शेती, पाण्याची कार्यक्षमता आणि अचूक शेतीचा अवलंब करण्यास प्रेरणा देईल.
- शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य: ही योजना अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज सहाय्य प्रदान करेल, ज्यामुळे आधुनिक उपकरणे, दर्जेदार बियाणे आणि प्रगत शेती तंत्रे अधिक सुलभ होतील.
- कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांचा विकास: या उपक्रमामुळे पंचायत आणि ब्लॉक पातळीवर कार्यक्षम साठवणूक, गोदाम आणि रसद पुरवून कापणीनंतरचे नुकसान कमी होईल.
- सिंचन विस्तार: ही योजना सिंचन व्याप्ती वाढवेल आणि पीक तीव्रता आणि उत्पन्न स्थिरता वाढविण्यासाठी कार्यक्षम पाणी वापर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देईल.
- तंत्रज्ञान एकत्रीकरण: ही योजना उत्पादन वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती साधनांना प्रोत्साहन देते.
























