(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी मिलिंद एकबोटेंवर पुण्यातील कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा
मिलिंद एकबोटेंच्या विरुद्ध संभाजी ब्रिगेडच्या सतिश काळे यांनी तक्रार दिलीय तर स्थानिक व्यक्तींकडूनही तक्रार देण्यात आली आहे
पुणे : मिलिंद एकबोटेंवर पुण्यातील कोंढवा पोलिस स्टेशनमधे प्रक्षोभक वक्तव्य करून दोन समाजांमधे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन गुन्हे नोंद करण्यात आलेत. पुणे महापालिकेच्या वतीने कोंढवा भागात मुस्लिम समाजासाठी हज हाऊस उभारण्यात येणार आहे. मिलिंद एकबोटेंनी हे हज हाऊस उभारण्याला विरोध करताना प्रक्षोभक वक्तव्य करून ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मिलिंद एकबोटेंच्या विरुद्ध संभाजी ब्रिगेडच्या सतिश काळे यांनी तक्रार दिलीय तर स्थानिक व्यक्तींकडूनही तक्रार देण्यात आलीय .
मिलिंद एकबोटे हे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात देखील आरोपी असून सध्या जामिनावर आहेत. कोंढवा भागात मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. या भागात हजला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी हज सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली हज हाऊस उभारण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेने घेतलाय. त्यासाठी चार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलीय.हज हाऊसचे कामही नुकतेच सुरू झालेय. मात्र समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटेंनी हे हज हाऊस उभारण्याला विरोध करायच ठरवलंय. त्यासाठी एकबोटेंनी त्यांच्या वक्तव्यचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मिडीयावर टाकला.
त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या आयुक्तांना भेटून एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांनी हज हाऊस उभारण्याला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदनही दिले आहे. एकबोटेंच्या सोशल मीडीयावर व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे दोन समाजांमधे तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. एकबोटेंनी कोंढवा परिसराबद्दल केलेले वक्तव्य देखील आक्षेपार्ह असल्याचा आरोप आहे. संभाजी ब्रिगेड आणि स्थानिक मुस्लिम नेत्यांकडून एकबोटेंच्या विरुद्ध दोन तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी एकबोटेंच्या विरुद्ध दोन गुन्हे नोंद केलेत.