नवी दिल्ली : पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ एक अभियान सुरू केलं आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सोमवारी अध्यात्मिक गुरु सदगुरु जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.


मोदींनी ट्वीट केलं की, 'नागरिकत्व दुरूस्ती कायद्याशी निगडीत बाबींची स्पष्ट व्याख्या आणि इतर काही गोष्टी सद्गुरूंकडून ऐका. त्यांनी अनेक ऐतिहासिक संदर्भांचा हवाला दिला आहे. तसेच आपल्या बंधुत्वाची संस्कृती उत्तम प्रकारे समजावून सांगितली आहे. याचसोबत स्वार्थासाठी पसरवण्यात आलेल्या काही समूहांच्या गोष्टींचं सत्य सर्वांसमोर मांडलं आहे.'


पंतप्रधानांच्या खासगी वेबसाईटच्या ट्विटर हॅन्डलवरही एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, 'नागरिकत्व दुरूस्ती कायदा हा अन्यायांचा शिकार झाल्यामुळे भारतात शरण आलेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. तसेच यामुळे कोणत्याच व्यक्तीचं नागरिकत्व धोक्यात येणार नाही.' हा मेसेज 'इंडिया सपोर्ट्स सीएए' या नावाच्या हॅशटॅगने पोस्ट करण्यात आला आहे.

नागरिकत्व विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यापासूनच देशभरात अनेक ठिकाणी या काद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनांनी हिंसक वळण घेतलं आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशसह देशातल्या इतर राज्यातही आंदोलनाला हळूहळू हिंसक वळण मिळताना दिसत आहे. तर मंगळुरुत झालेल्या हिंसक आंदोलनात 2 जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान काल महाराष्ट्रातही जवळपास 15 हून अधिक जिल्ह्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी मुस्लीम समाज रस्त्यावर उतरला होता.

पाहा व्हिडीओ : CAA, NRC आणि NPR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुलाखत



नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर आता नागरिकत्व संशोधन विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानातील सहा समुदायातील लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि इसाई या सहा समुदायातील लोक जे 31 डिसेंबर, 2014 आधी भारतात आले आहेत, त्यांना सरसकट भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

अलीगड मुस्लीम विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झडप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव वाढला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या दगडफेकीत काही सुरक्षारक्षकही जखमीही झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठ परिसरातील सर्व रस्ते बंद केले होते. विद्यापीठातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन वातावरण शांत होईपर्यंत विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्व हॉस्टेल्सही खाली करण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्राध्यापक अफीफ उल्लाह खान यांनी दिली.

संबंधित बातम्या : 

CAA आणि NRC बद्दल तुमच्याही मनात आहेत 'हे' प्रश्न, जाणून घ्या नेमकी उत्तरं

सर, तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग; रेणुका शहाणेचा मोदींच्या ट्वीटला रिप्लाय

CAA वर बोलणं महागात, हरियाणा सरकारने परिणीती चोप्राला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर पदावरुन हटवलं

CAA विरोधातल्या हिंसक आंदोलनात आठ जणांचा मृत्यू, 50 पोलीस जखमी