मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरातून अनेक लोक विरोध करत आहेत. CAA विरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. लोक याविरोधात बोलू लागले आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अनेक कलाकारदेखील नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा हिनेदेखील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आणि त्याविरोधातील आंदोलनांबात ट्विटरद्वारे तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु परिणीतीला त्याची मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे बोलले जात आहे.


परिणीती चोप्रा ही हरियाणा सरकारच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या मोहीमेची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर होती. परंतु तिला या पदावरुन हटवण्यात आले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तिने गेल्या काही दिवसात केलेल्या ट्वीट्समुळेच तिची या पदावरुन हकालपट्टी केली असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. परंतु अद्याप हरियाणा सरकारकडून त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही.


परिणीतीने 17 डिसेंबर रोजी CAA बाबत एक ट्वीट केले होते, त्यामध्ये तिने म्हटले होते की, CAA सारखे कायदे बनवल्यानंतर त्याला एखादा नागरिक विरोध करु लागला आणि हा सगळा प्रकार (हिंसक आंदोलन) घडू लागला तर आणि CAA विसरायला हवा. इथून पुढे आपण आपल्या देशाला लोकशाही राष्ट्र न म्हटलेलं बरं. आपली मत मांडणाऱ्या लोकांना मारणे हा निर्दयीपणा आहे.