नवी दिल्ली : झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी मोरहाबादी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्यात सोरेन यांनी झारखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हेमंत सोरेन यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आलमगीर आलम, रामेश्वर उरांव आणि राष्ट्रीय जनता दलाकडून यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते.


राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी या नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या झारखंडच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करत काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे भाजपच्या हातून महाराष्ट्र पाठोपाठ झारखंडही निसटलेलं आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज सायंकाळी कॅबिनेटची पहली बैठक बोलावली आहे.

शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती -
हेमंत सोरेन यांच्या शपथविधीवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव डी राजा, अतुल अंजान आणि डीएमके नेता एम के स्टालिन उपस्थित होते. दरम्यान, यात माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सहभागी होऊ शकले नाही. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती देखील गैरहजर होते.

व्यस्त कार्यक्रमांमुळे पंतप्रधान मोदी अनुपस्थित : जेएमएम
झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रवक्ता आणि महासचिव सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले की, हेमंत सोरेन यांनी शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आमंत्रण दिलं आहे. परंतु, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी हेमंतर सोरेन यांना शुभेच्छआ दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान म्हणाले की, वेळ मिळताच ते झारखंडमध्ये येणार आहे.

असा होता झारखंड निवडणुकांचा निकाल
झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला 46 जागा मिळाल्या असून भाजपला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस आघाडीत झारखंड मुक्ती मोर्चाला 28 जागा मिळाल्या असून काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आहेत. झारखंडमध्ये 81 जागांवर मतदान झालं होतं. प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. बहुमतासाठी लागणारा 41 आकडा असून काँग्रेस आघाडीनं 46 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा - बालकांचा मृत्यू होणं यात काहीही नवीन नाही, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं असंवेदनशील वक्तव्य

Jharkhand Assembly Election | झारखंड विधानसभा, भाजपचं पानिपत, स्थानिक मुद्द्यांचा भाजपला का विसर पडतो? | ABP Majha