मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर आंदोलने सुरु आहेत. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन लोकांना शांततेंचं आवाहन केलं. मोदींच्या या ट्वीटला अभिनेत्री रेणुका शहाणेने रिट्वीट केलं आणि भाजपच्या आयटी सेलला शांत राहण्याचं आणि अफवा न पसरवण्याचं आवाहन करा, असं मोदींना सांगितलं.
रेणुका शहाणेने रिट्वीट करताना म्हटलं की, "सर, तुम्ही कृपया तुमच्या (भाजप) सर्व आयटी सेटला ट्विटर हँडलपासून दूर राहण्याचं आवाहन करा. जास्तीत जास्त अफवा त्यांच्याकडून पसरवल्या जात आहेत. त्यांची जास्तीत जास्त माहिती खोटी आणि भ्रम पसरवणारी असते. ती देशातील शांती, एकात्मतेच्या विरोधात आहे. तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा." रेणुका शहाणेचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपसह हजारो युजर्सनी रेणुका शहाणेचं ट्वीट रिट्वीट केलं आहे.
जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, "देशात शांतता टिकवून ठेवण्याची वेळ आहे. देशात एकता आणि बंधूभाव टिकवायला हवा. मी सर्वांना आवाहन करतो की, सर्वांनी या हिंसक आंदोलनांपासून दूर राहावे. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आहे. देशाच्या विकासासाठी, सशक्त लोकशाही टिकवण्यासाठी, उपेक्षित आणि गरिबांच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे."
अभिनेता राजकुमार रावने ही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांविरुद्धच्या पोलीस कारवाईचा निषेध केला आहे. पोलिसांचं कृत्य हिंसक असून हिंसा कोणत्याही समस्येचं समाधान असू शकत नाही, असं राजकुमारने म्हटलं आहे. नागरिकांना शांततेत विरोध प्रदर्शन करण्याचा अधिकार असल्याचं राजकुमारने म्हटलं.
Majha Vishesh | नागरिकत्व दुरुस्ती विरोध, पण हिंसेचं समर्थन? | ABP Majha
संबंधित बातम्या
- CAA Protest : हिंसक आंदोलनं दुर्दैवी, समता टिकवणं गरजेचं; मोदींचं आवाहन
- CAA Protest : आंदोलनांच्या केंद्रस्थानी असलेल्या जामिया आणि अलीगड विद्यापीठांचा इतिहास
- Jamia Protests | हिंसेचा व्हिडीओ अक्षयकडून लाईक, नेटीझन्सनी झोडपल्यानंतर सारवासारव
- नागरिकत्व कायद्याविरोधात अलीगड विद्यापीठात विद्यार्थांचं हिंसक आंदोलन, विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंद