एक्स्प्लोर
ऑगस्टा घोटाळ्यावरील लक्ष हटवण्यासाठी राहुल गांधींकडून आरोप : भाजप
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरील लक्ष हटवण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींकडून आता पंतप्रधानांना लक्ष्य केलं जात आहे, असं प्रत्युत्तर भाजपने राहुल गांधींच्या आरोपांना दिलं आहे.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी गुजरातच्या सभेत केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं भाजपने स्पष्ट केलं.
दरम्यान राहुल गांधींच्या या आरोपाचा ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याच्या चौकशीवर कसलाही परिणाम होणार नसून सीबीआयकडून चौकशी सुरुच राहिल, असं रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं.
स्वतःच्या नेतृत्वात सतत पराभवामुळे राहुल गांधी हताश : रविशंकर प्रसाद
काँग्रेसला जनतेने नाकारलं आहे. महाराष्ट्र, चंदीगड, गुजरातमध्ये स्वतःच्या नेतृत्वात पराभव झाल्यामुळे राहुल गांधी हताश झालेले आहेत. त्याचा राग काढण्यासाठी अशा बिनबुडाच्या आरोपांचा आधार घेतला जात असल्याचा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावला.
राहुल गांधी स्वतःच 5 हजार कोटींच्या घोटाळ्यात जामिनावर : रविशंकर प्रसाद
राहुल गांधींनी होमवर्क करुन सभेत बोलत जावं, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले. राहुल गांधी स्वतःच 5 हजार कोटींच्या नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात जामिनावर असून देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करत आहेत. त्यांनी कोणावर आरोप करण्यापूर्वी आपल्या पक्षाचा इतिहास पाहावा, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले.
काय आहेत राहुल गांधींचे आरोप?
गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहारा समुहाने 40 कोटी रुपये दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. मोदींचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमधील मेहसाणामध्ये राहुल गांधींची सभा पार पडली. या सभेत राहुल गांधींनी मोदींवर आरोपांचा भडीमार केला.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाराने त्यांना 6 महिन्याच्या कालावधीत 9 वेळा पैसे दिल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 22 नोव्हेंबर 2014 रोजी आयकर विभागाने सहारावर टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्र हाती लागली आहेत. त्याची सखोल चौकशी कऱण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे.
इतकेच नव्हे तर बिर्ला समुहावरील छाप्यात आयकर विभागाला एक डायरी आढळली होती. यात 'गुजरात सीएम 25 कोटी' असा उल्लेख आढळल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे. आता या सर्व आरोपांची चौकशी करण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे.
प्रकरण सुप्रीम कोर्टातही
दरम्यान राहुल गांधींनी मोदींवर जे आरोप लावले आहेत, ते प्रकरण अगोदरच सुप्रीम कोर्टातही गेलं आहे. मात्र राहुल गांधींनी आज सादर केलेल्या पुराव्यांना कोर्टाने अवैध ठरवलं. एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीविरोधात गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. मात्र हे प्रकरण पुढे चालवण्यासाठी आवश्यक पुरावे नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.
प्रशांत भूषण यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.
संबंधित बातमी : मोदींना मुख्यमंत्री असताना सहाराने 40 कोटी दिले, राहुल गांधींचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement