Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली; संभाजीराजे दिल्लीत दाखल
Maratha Reservation : आज दुपारी 3 वाजता दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांची छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ भेट घेणार आहेत.
नवी दिल्ली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या पार्शभुमीवर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) व मराठा समाजाचे शिष्टमंडळ आज केंद्रिय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्थरावर संभाजीराजे हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीशी दिसुन येत आहेत. सोबतच, कायदेशीर प्रक्रिया संभाजीराजेंना माहिती असल्याने ते विशेष पुढाकार घेताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली होतांना दिसत आहे. आज (28नोव्हेंबर) रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांची छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ भेट घेणार आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केल्याच्या पहिल्या दिवसापासून छत्रपती संभाजीराजे त्यांच्या मदतीला धावून येत आहे. विशेष म्हणजे जरांगे यांच्या उपोषणास्थळी देखील संभाजीराजे यांनी अनेकदा भेट देऊन आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा केली. तसेच, सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा होईल तितक्या लवकर मार्गी लावावा असे आवाहन देखील संभाजीराजे यांनी केले आहे. दरम्यान, आज देखील मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी छत्रपती संभाजीराजे दिल्लीत पोहचले आहे. दिल्ली येथील मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयात जाऊन संभाजीराजे हे केंद्रीय मागासवर्ग अयोगाचे अध्यक्ष श्री हंसराज अहिर यांची भेट घेणार आहे. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत मराठा समाजाचे शिष्टमंडळ देखील असणार आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यात मराठा आरक्षणावरून मोठ्या घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाची देखील भेट घेतली होती...
संभाजीराजे आज दिल्लीत केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांची भेट घेणार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या पुणे येथील कार्यालयात भेट देऊन मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे प्रश्न आयोगाच्या समोर मांडले होते. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळविण्यासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबरच कायदेशीर लढाई सुध्दा लढली पाहिजे, यासाठी आपण राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले होते. यावेळी त्यांच्यासोबत मराठा समाजाचे शिष्टमंडळ देखील उपस्थित होते. ज्यात स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष अंकुश कदम, विनोद साबळे, आप्पासाहेब कुढेकर, रघूनाथ चित्रे, प्रशांत पाटणे, राहूल शिंदे, महादेव तळेकर, संजय पवार, गणेश सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या: