एक्स्प्लोर
Advertisement
अकबराने 'अलाहाबाद' वेगळं शहर वसवलं होतं, 'प्रयाग'चं नाव नव्हतं बदललं!
आताचं अलाहाबाद शहर ज्या ठिकाणी वसलेलं आहे, त्या ठिकाणाचा पुराणकथांपासून रामायण, महाभारतासारख्या धार्मिक महाकाव्यांपर्यंत सगळीकडे 'प्रयाग' असाच उल्लेख आहे.
अलाहाबाद : उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध अलाहाबाद शहर आता 'प्रयागराज' नावाने ओळखलं जाईल. कारण योगी सरकारने अलाहाबादचं नाव बदलून 'प्रयागराज' असे नाव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. मात्र आता अलाहाबादच्या नामांतरावरुन उत्तर प्रदेशसह देशभरात दोन मतप्रवाह आहेत. एक म्हणजे, अलाहाबादचं नाव बदलून योगी सरकार स्थानिक जनतेच्या भावनांशी खेळत आहे, तर दुसरं म्हणजे, अलाहाबादचं नाव बदलून योगींनी एकप्रकारे 444 वर्षांपूर्वी मुगल बादशाह अकबराने बदललेलं नाव काढून या शहराला पुन्हा मूळ नाव दिलंय.
आताचं अलाहाबाद शहर ज्या ठिकाणी वसलेलं आहे, त्या ठिकाणाचा पुराणकथांपासून रामायण, महाभारतासारख्या धार्मिक महाकाव्यांपर्यंत सगळीकडे 'प्रयाग' असाच उल्लेख आहे. 1574 साली मुगल बादशाह अकबराने ज्या ठिकाणाचे नाव 'अलाहाबाद' ठेवले, त्या ठिकाणाचं त्याआधी नेमकं काय नाव होतं, याचा उल्लेख इतिहासात कुठेच नाही. 'प्रयाग' हे पौराणिक नाव आहे, तर 'अलाहाबाद' हे अकबराने दिलेले नाव आहे. त्यामुळे अकबराने 'प्रयाग'चं नाव बदलून 'अलाहाबाद' ठेवलं, असे म्हणत धार्मिक तेढ निर्माण करणं चूक आहे.
खरंतर धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख असलेलं 'प्रयागराज' हे तीर्थस्थळ आहे. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगम आणि ब्रम्हामुळे अश्वमेध यज्ञामुळे 'प्रयाग'ला तीर्थस्थळांचा राजा म्हटलं जातं. कुंभ-अर्धखुंभ आणि माघ महिन्यातील यात्राही या त्रिवेणी संगामाच्या किनारी अगदी प्राचीन काळापासून होत आल्या आहेत. मात्र, अकबराने अलाहाबाद नावाचं जे शहर वसवलं, ते प्रयाग नव्हतं.
प्रयागमध्ये गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर ओसाड पडलेल्या जागेवर नवीन शहर अकबराने वसवलं आणि त्याला 'अल्लाहाबास' असे नाव दिले. पुढे 'अलाहाबाद' असा उल्लेख होऊ लागला. प्रयाग या तीर्थस्थळी अकबर येऊन गेल्याचेही उल्लेख सापडतात, मात्र त्याने प्रयागची ओळख संपवली नाही, तर अलाहाबाद नावाने वेगळं शहर वसवलं.
धर्माचे अभ्यासक आचार्य राम नरेश त्रिपाठी यांच्या माहितीनुसार, प्रयागचं वर्णन स्कंदपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, ब्रह्मपुराण, विष्णुपुराण आणि नरसिंहपुराण यांसह इतर पुराणांमध्ये सुद्धा आहे. पद्मपुराणात गंगा आणि यमुना या नद्यांच्या मधोमध सुपिक अशी जमीन होती. रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांमध्येही अकबराने वसवलेल्या अलाहाबद शहाच्या ठिकाणी आधी कोणती नागरी संस्कृती होती, असा उल्लेखच नाहीय.
अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठातील मध्यकालीन इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. योगेश्वर तिवारी यांच्या माहितीनुसार, धर्मग्रंथात प्रयागचं जे वर्ण आहे, तीही गंगेच्या दुसऱ्या किनाऱ्यावरील जागा आहे. जिथे आता झुंसी शहर वसलेलं आहे. याआधी झूंसीला प्रतिष्ठानपुरी नावाने ओळखलं जाई. झूंसीच्या परिसरातील नागरी संस्कृती प्राचीन आहे. प्रतिष्ठानपुरी चंद्रवंशी राजा पुरुची राजधानीही होती.
इतिहासकार सय्यद अजादार हुसेन यांच्या माहितीनुसार, आपल्या राज्याचा विस्तार करताना 1574 सालाच्या आसपास अकबर जेव्हा तीर्थराज प्रयागच्या येथे आला, तर त्याने गंगा-यमुनेच्या मधोमध जी रिकामी जागा होती, त्या जागेची उपयुक्तता जाणली आणि त्या ठिकाणी नवे शहर वसवण्याचे ठरवले. त्यानंतर अकबर अनेकदा या ठिकाणी आला. पुढे त्याने या ठिकाणाला 'अल्लाहाबास' असे नाव दिले. अल्लाहाबस म्हणजे अशी जागा जी अल्लाहने वसवली आहे. पुढे अकबराच्या काळातच 'अल्लाहाबास'चे नामकरण 'अल्लाहाबाद' करण्यात आले. पुढे त्याचा 'अलाहाबाद' असा उच्चार होऊ लागला.
अकबराने वसवलेल्या शहराबाबत इतिहासकारांमध्येही मतभेद पाहायला मिळतात. प्रा. योगेश्वर तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, कुंभ आणि माघी यात्रेत येणाऱ्या भाविकांना आपल्या राज्याचा संदेश देण्यासाठीच प्रयागच्या बाजूला अकबराने अलाहाबाद शहर वसवलं. तर इतिहासकार सय्यद अजादार हुसेन यांच्या म्हणण्यानुसार, अलाहाबाद ज्या ठिकाणी अकबराने वसवलं, ते ठिकाण गंगा-यमुनेच्या मधोमध होते, त्यामुळे पाण्याचा मुबलक साठा होता, हे लक्षात घेऊन हे शहर वसवलं. तिथे शहर वसवणं आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम होतं. त्याचसोबत सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य ठिकाण मानलं जात होतं. एकंदरीत अलाहाबाद शहर वसवण्याला धार्मिक नव्हे, तर व्यवहार्य कारणं असल्याचे दोन्ही इतिहासकारांच्या दाव्यावरुन लक्षात येतं.
मुघलकाळातच अलाहाबाद शहराचा विकास झाला आणि खुसरोबागसह इतर ऐतिहासिक वास्तूंची उभारणी करण्यात आली. पुढे इंग्रजांनी शहराचा विकास आणि सौंदर्यीकरण केलं.
इंग्रजांच्या काळातच अलाहाबाद जिल्ह्याची सीमा निश्चित करण्यात आली आणि प्रयागराज तीर्थस्थळाचाही त्यात समावेश करण्यात आले. गंगा-यमुनेच्या संगमाच्या ठिकाणी आजही प्रयाग आणि प्रयागघाट असे दोन रेल्वेस्थानकं आहेत, तर जंक्शन अलाहाबाद नावाने ओळखलं जातं.
एकंदरीत प्रयागराज एक तीर्थस्थळ आहे, तर अलाहाबाद शहर तीर्थस्थळाला जोडून असलेलं शहर आहे. सराकरी कागदोपत्री अलाहाबाद जिल्हा बनवला गेला आणि प्रयाग तीर्थस्थळ म्हणून अलाहाबादच्या सीमेअंतर्गत आलं. मात्र आजही धार्मिक कार्यक्रमांसाठी अलाहाबादऐवजी प्रयाग नावाचाच उल्लेख होतो.
"प्रयागराज आणि अलाहाबाद दोन्ही शहरं एकमेकांना पूरक असून, आपापली ओळख स्वतंत्र बाळगून आहेत. एकमेकांच्या बाजूला असलेल्या या शहरांनी एक-दुसऱ्याची ओळख संपवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे सरकारी कागदोपत्री अलाहाबादच ठेवून, जवळपासचा परिसर प्रयागराज नावाने विकसित करुन, तिथे धार्मिक-आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन केले गेले असते, तर खूप बरे झाले असते.", अशा भावना प्रसिद्ध साहित्यकार यश मालवीय यांनी व्यक्त केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement