Richest Temple in India : भारतातील सर्वात श्रीमंत 9 मंदिरं, संपत्ती ऐकूण व्हाल थक्क; 'ही' यादी एकदा पाहाच
Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. राम मंदिर देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. याआधी भारतातील 9 श्रीमंत मंदिरांची माहिती जाणून घ्या.
Richest Temple in India : अयोध्येमध्ये (Ayodhya) प्रभू श्रीरामाचं आगमन झालं आहे. राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीरामाच्या बालस्वरुपप विलोभनीय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यानंतर अयोध्येतील राम मंदिर देशात सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक बनलं आहे. देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांच्या यादीत आता अयोध्या राम मंदिराचं नावही जोडलं गेलं आहे. राम मंदिराआधी भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरे कोणती, ही यादीवर एकदा पाहा.
तिरुमाला तिरुपति वेंकटेश्वर मंदिर, आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार, या मंदिराची एकूण संपत्ती तीन लाख कोटी रुपये आहे. या मंदिराची दरवर्षी सुमारे 1,400 कोटी रुपये कमाई होते. ही रक्कम देशातील आघाडीच्या कंपन्या जी विप्रो, नेस्ले, ओएनजीसी, इंडियन ऑइल या कंपन्यांच्या एकूण मूल्यापेक्षा जास्त आहे.
पद्मनाभ स्वामी मंदिर, तिरुवनंतपुरम, केरळ
केरळमध्ये असलेल्या पद्मनाभ स्वामी या मंदिराची एकूण संपत्ती 1.20 लाख कोटी रुपये आहे. अलीकडेच या मंदिरात एक नवीन खजिना सापडला आहे, ज्यामध्ये सोने, चांदी आणि हिरे आणि दागिन्यांचा मोठा साठा आहे.
गुरुवायूर देवसम, गुरुवायूर, केरळ
भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेल्या गुरुवायूर देवसम मंदिराकडेही अमाप संपत्ती आहे. या मंदिरात 1,737.04 कोटी रुपयांची बँक ठेव आहे. याशिवाय मंदिराकडे 271.05 एकर जमीन आहे. 2022 मधील एका आरटीआयमध्ये ही माहिती समोर आली आहे.
सुवर्ण मंदिर, अमृतसर, पंजाब
शिखांचे सर्वात मोठे धार्मिक केंद्र असलेलं सुवर्ण मंदिरही देशातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातून दरवर्षी 500 कोटी रुपये कमावले जातात. मंदिर बांधण्यासाठी सुमारे 400 किलो सोने वापरण्यात आलं आहे.
सोमनाथ मंदिर, गुजरात
गुजरातमधील सोमनाथ मंदिराची स्वातंत्र्यानंतर पुनर्बांधणी करण्यात आली. हे मंदिर बनवताना आतील भागात 130 किलो सोने वापरण्यात आलं. मंदिराच्या शिखरावर 150 किलो सोने वापरण्यात आलं आहे. मंदिराची 1700 एकर जमीन कोट्यवधींची आहे.
वैष्णो देवी मंदिर, जम्मू
वैष्णोदेवी मंदिर हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. देवीच्या पूजेसाठी समर्पित असलेल्या या मंदिराला गेल्या दोन दशकात 1800 किलो सोने, 4700 किलो चांदी आणि 2 हजार कोटी रुपयांची रोख देणगी मिळाली आहे.
जगन्नाथपुरी मंदिर, ओदिशा
ओदिशामध्ये असलेले जगन्नाथपुरी मंदिर हे मंदिर देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये गणलं जातं. जगन्नाथपुरी मंदिराची एकूण संपत्ती 150 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. रथयात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिराची 30 हजार एकरपेक्षा जास्त जमीन आहे.
साईबाबा, शिर्डी, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा मंदिराची गणना देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये केली जाते. या मंदिरात साईबाबांच्या मूर्तीसाठी 94 किलो सोन्याचं सिंहासन तयार करण्यात आलं आहे. 2022 मध्ये भक्तांनी मंदिराला 400 कोटी रुपयांहून अधिक दान केलं होतं.
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील सिद्धिविनायक या गणपती मंदिराची एकूण संपत्ती 125 कोटी रुपये आहे. या मंदिराला दररोज 30 लाखांची कमाई होते.