(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित, विराट, बिग बी ते अंबानी; रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण, 22 जानेवारीला भव्य सोहळा
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमासाठी देशभरातील नामवंत आणि व्हीआयपी लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
Ayodhya Ram Lalla New Teample: अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. अयोध्येतील नव्या भव्य दिव्य राम मंदिरा रामलल्लांच्या अभिषेक प्रसंगी देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. कलाकार, साहित्यिक, धार्मिक नेते आणि क्रीडा जगतातील मोठ्या व्यक्तींचा समावेश आहे. या प्राण प्रतिष्ठेसाठी 7 हजार जणांना आमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 22 जानेवारीला अयोध्येतील नव्या राम मंदिराचे उद्घाटन (Ayodhya Ram Lalla New Grand Teample) करतील आणि त्यांच्या हस्ते रामलालाचा अभिषेकही केला जाईल.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, फिल्म स्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासह जवळपास सात हजार जणांना, राम मंदिरात राम ललांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवलं आहे. याशिवाय, दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'रामायण' मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि देवी सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी 1992 मध्ये मारल्या गेलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. आमंत्रित व्हीव्हीआयपींमध्ये राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योग गुरु राम देव, उद्योगपती रतन टाटा, उद्योगपति गौतम अदाणी यांचा समावेश आहे.
मंदिर आंदोलनात सहभागी नेत्यांना पहिलं निमंत्रण
साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींशिवाय राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व करणारे भाजपचे बडे नेतेही प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दिसणार आहेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. याशिवाय विविध धर्मगुरूही राम लालाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यात केवळ हिंदूच नव्हे तर जैन धर्मातील महागुरूंचाही समावेश करण्यात आला आहे. जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी यांनाही मंदिर ट्रस्टनं कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
'या' खेळाडूंनाही निमंत्रण
राम लालाच्या अभिषेक सोहळा दिमाखात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नामांकीत व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये क्रीड क्षेत्रातील दिग्गजांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीत अनेक खेळाडूंची नावे आहेत. देशातील प्रसिद्ध फुटबॉलपटू की भाईचुंग भूतिया, ऑलिम्पियन मेरी कोम, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, पी गोपीचंद, क्रिकेटपटू रोहित शर्मा, सुनील गावस्कर, कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांच्या नावानं निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही राम मंदिराच्या उद्घाटनाची निमंत्रणं पाठवली जात आहेत.
प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा
नियोजित कार्यक्रमाच्या अभिषेक समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अभिषेक सोहळा त्यांच्याच हस्ते होणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व पाहुण्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. या कार्यक्रमात सर्व संत आणि धर्मगुरूंना सहभागी होण्यासाठी नियम निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व संतांना त्यांचं आधार कार्ड सोबत ठेवावं लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल, पर्स, पिशवी, छत्री, कक्ष, सिंहासन, वैयक्तिक पूजा ठाकूर किंवा गुरु पादुका कार्यक्रमस्थळी नेणं शक्य होणार नाही.