Atal Tunnel Inauguration : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'अटल टनल'चं उद्घाटन; लष्करासह सामान्य लोकांना मोठी भेट
हिमाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'अटल टनल'चं उद्घाटन करण्यात आलं. जगातील सर्वात लांब बोगदा आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सीमावादावरून गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लांब हायवे बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. हिवाळ्यात पूर्व लडाखला संपूर्ण भारताशी जोडणाऱ्या या बोगद्याचं नाव 'अटल टनल' असं ठेवण्यात आलं आहे.
सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या बोगद्याचं उद्घाटन करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचले होते. पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील 'अटल टनल'च्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. हिमाचल प्रदेश येथील कुल्लु मनाली आणि लाहौल-स्पिति जिल्ह्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या 9 किलोमीटर लांब या बोगद्याचं काम गेल्या 10 वर्षांपासून सुरु होतं.
हिमवर्षावातही रहदारी खुली राहणार
अटल टनल जगातील सर्वात लांब हायवे बोगदा आहे. हा 9 किलोमीटर लांब बोगदा, मनालीला वर्षभर लाहौल-स्पिति खोऱ्यांशी जोडून ठेवणार आहे. याआधी खोऱ्यातील गावांचा दरवर्षी जवळपास 6 महिन्यांपर्यंत बर्फवृष्टीमुळे इतर शहरांशी संपर्क तुटत होता. आता 'अटल टनल'मुळे ही समस्या दूर होणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा असून याची लांबी दहा हजार फुटांहून अधिक आहे.
'अटल टनल' पूर्ण करण्यासाठी अंदाजे 6 वर्षांहून कमी वेळ लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, जवळपास 10 वर्षांमध्ये 'अटल टनल'चं काम पूर्ण करण्यात आलं. बोगद्यामध्ये 60 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर प्रत्येक 500 मीटरवर आपातकालीन मार्ग आहेत. बोगद्यामुळे मनाली आणि लेह यांच्यातील अंतर कमी होणार असून प्रवासातील एकूण वेळेपेक्षा 4 तासांची बचत होणार आहे. तसेच आग लागल्यास बोगद्याच्या आत अग्निशामक यंत्र देखील बसविण्यात आले आहेत.
'अटल टनल'मुळे हिमाचल प्रदेशचा लाहौल-स्पिति परिसर आणि संपूर्ण लडाख आता देशातील इतर भागांशी 12 महिने जोडला जाणार आहे. कारण रोहतांग-पास येथे हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बंद होतात. ज्यामुळे लाहौल-स्पितिमार्फत लडाखला जाणारा हायवे सहा महिन्यांसाठी बंद होत असेल. परंतु, आता 'अटल टनल'मुळे ही समस्या दूर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मित्र डोनाल्ड, लवकर बरे व्हा!'
देशात कोरोना बळींची संख्या 1 लाखांच्या पार; रोज सरासरी हजार रुग्णांचा मृत्यू