(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केवळ प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं; अनुपम खेर यांचा मोदी सरकारवर निशाणा
केंद्रातील सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून आता स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं असल्याचं अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी म्हटलं आहे.
मुंबई : अभिनेते अनुपम खेर हे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे कट्टर समर्थक मानले जातात. आता देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार कुठे न कुठे कमी पडलं असून स्वत:ची प्रतिमा निर्मिती करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे अशा प्रकारची टीका अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलंय. अनुपम खेर यांनी मोदी सरकारवर केलेल्या या टीकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचंही दिसून आलं आहे.
अनुपम खेर यांना सरकारची प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न आणि काही नद्यांमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या लोकांचे प्रेत दिसत असल्यासंबंधी एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना अनुपम खेर म्हणाले की, "या प्रकरणात सरकारवर जी टीका होतेय ती वैध आहे. या परिस्थितीत सरकारने ते काम करावं ज्यासाठी त्यांना निवडून दिलं आहे. देशात आज जी काही परिस्थिती आहे त्यावर कोणालाही वेदना होऊ शकतात. देशातील नद्यांमध्ये तरंगणारी प्रेतं यावरुन कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करण्याची ही वेळ नाही. आपण देशातील एक जबाबदार नागरिक या नात्याने सरकारला जाब विचारला पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत."
अनुपम खेर यांच्या पत्नी भाजपच्या खासदार
अनुपम खेर यांनी अशा प्रकारचे मत व्यक्त केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. गेल्या आठवड्यात एका व्यक्तीने देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन मोदी सरकारवर ट्वीटच्या माध्यमातून टीका केली होती. त्यावर अनुपम खेर यांनी 'आयेगा तो मोदीही' असं उत्तर दिलं होतं. त्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :
- देशातील बहुतांश भागात सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्यात यावा; ICMR चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांचा सल्ला
- अकरावी CET प्रवेश परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचा अंतिम निर्णय लवकरच; शिक्षण विभागाचा सर्वेक्षण अहवाल शासनाला सुपूर्द
- एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मॅट कोर्टाचा दिलासा; गोंदियात झालेल्या बदलीवर कोर्टाची स्थगिती