Mekapati Reddy : आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योग मंत्री मेकापती गौतम रेड्डी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 50 वर्षांचे होते.  रेड्डी हे त्यांच्या राहत्या घरी अचानक कोसळले. त्यामुळे त्यांना आज सकाळी पावणे आठ वाजता उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला.  


 मेकापती गौतम रेड्डी यांना कुटुंबीयांनी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु, ते उपचारास प्रतिसाद देत नव्हते.  त्यांना श्वास घेता येत नव्हता, त्यांना हृदयविकाराचा झटका  आल्यामुळे त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अपोलो रूग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. 


रूग्णालयात दाखल केल्यानंतर रेड्डी यांच्यावर तत्काळ सीपीआर शस्त्रक्रिया करण्यात आली. शिवाय आपत्कालीन विभागात प्रगत कार्डियाक लाईफ सपोर्टही देणायात आला. इमर्जन्सी मेडिसिन टीम आणि ह्रदयरोग तज्ञ त्यांच्यावर उपचार करत होते. रूग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्यावर 90 मिनिटांपेक्षा जास्त काळ सीपीआर करण्यात आला. परंतु, आम्ही खूप प्रयत्न करूनही त्यांना वाचवू शकलो नाही. आज सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.  







रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील आत्मकुरु विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ते जगनमोहन रेड्डी यांच्या  सरकारच्या मंत्रिमंडळातील उद्योग, वाणिज्य, आयटी आणि कौशल्य विकास विभाग सांभाळत होते. दरम्यान, गेल्या आठवड्यातच रेड्डी हे दुबई दौऱ्यावर गेले होते. आंध्र सरकारने गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दुबई ऑटो एक्सपोमध्ये अबू धाबी रोड शो कार्यक्रम आयोजित केला होता. येथे त्यांनी अनेक व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांची भेट घेतली होती.  


महत्वाच्या बातम्या