Karnataka Murder : कर्नाटकाच्या शिवमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हर्ष असं या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. हिजाबसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं बजरंग दलाच्या या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या हत्येनंतर शिवमोगा परिसरात तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. ही तणावपूर्ण स्थिती पाहता शिवमोगा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, परिसरातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. 


कर्नाटकात रविवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात काल एका 26 वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यानंतर तणाव वाढला आहे. ही घटना रात्री 9 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष असं बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात या हत्येचा हिजाब वादाशीही संबंध जोडला जात आहे. तपासादरम्यान असं आढळून आलं आहे की, हर्षनं नुकतीच त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर हिजाबविरोधात आणि भगव्या शालीच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली होती. 





या घटनेसंदर्भात कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र म्हणाले की, "4-5 तरुणांच्या टोळक्यानं 26 वर्षीय तरुणाची हत्या केली. या हत्येमागे कोणती संघटना आहे, हे मला माहीत नाही. सध्या शिवमोगा येथे कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शहरांतील सर्व शाळा, महाविद्यालयं दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत."


कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झालेला हिजाबचा वाद आता देशभर पसरला आहे. सोशल मीडियापासून रस्त्यांपर्यंत अनेक बड्या नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत या वादावर आपलं मत व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, हिजाबच्या वादाला सुरुवात झाल्यानंतर, बजरंग दल देखील या प्रकरणात सक्रिय झाला आणि सोशल मीडियासह सर्वत्र शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब न परिधान करण्याचं समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत हर्षनं लिहिलेली पोस्ट आणि ही घटना एकमेकांशी जोडली जात आहे. मात्र, पोलीस मात्र याबाबत काहीही बोलण्याचं टाळत आहेत.


एकीकडे कर्नाटकात हिजाब वादावरून आधीच वातावरण असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सुरू असून जिल्ह्यातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. 


काय आहे हिजाब वाद?


गेल्या महिन्यात उडुपी गव्हर्नमेंट प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या काही विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर हिजाबचा वाद सुरू झाला. या विद्यार्थीनींना वर्गात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. कॉलेजच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, ज्या विद्यार्थीनी आधी हिजाबशिवाय यायच्या त्या अचानक हिजाब घालून यायल्या लागल्या. त्यानंतर, विद्यार्थिनींनी हिजाबशिवाय वर्गात जाण्यास नकार देत निषेध सुरु केला. हा मुद्दा वादात सापडला असून कर्नाटकातील इतर जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातही हा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तणाव निर्माण होऊन अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha