देशातील 'रिअल हिरों'चा सन्मान, अंदमान-निकोबार समूहातील 21 बेटांना मिळाली 'या' 21 परमवीर विजेत्यांची नावं
Parakram Diwas: अंदमानातील रॉस आयलंडचे नामकरण आता नेताजी सुभाषचंद्र बोस असं करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: पराक्रम दिनाच्या (Parakram Diwas) निमित्ताने अंदमान आणि निकोबार समूहातील ( Andaman and Nicobar Islands) 21 बेटांना देशातील 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते या ही नावं आज देण्यात आली. पंतप्रधान मोदींनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपवर बांधल्या जाणाऱ्या, नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे अनावरण केले. या द्वीपाला पूर्वी रॉस आयलंड म्हणून ओळखले जात होते, आता त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप (Netaji Subhas Chandra Bose Dweep) या नावाने ओळखलं जाणार आहे. 2021 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सरकारने 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून घोषित केला होता.
अंदमान आणि निकोबार समूहातील सर्वात मोठ्या अज्ञात बेटाचे नाव प्रथम परमवीर चक्र पुरस्कार विजेते मेजर सोमनाथ शर्मा (Param Vir Chakra awardee Major Somnath Sharma) यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. मेजर सोमनाथ शर्मा यांनी 3 नोव्हेंबर 1947 रोजी श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं.
देशातील खऱ्या जीवनातील हिरोंना आदर देण्यास पंतप्रधानांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या भावनेने पुढे जात आता अंदमान आणि निकोबार बेट समूहातील 21 सर्वात मोठ्या अनामित बेटांना 21 परमवीर विजेत्यांची नावं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं पंतप्रधान कार्यालयाने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे.
या 21 परमवीर विजेत्यांची नावं बेटांना
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि हॉनी कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, एमएम, लेफ्टनंट रामा राघोबा राणे, नायक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग, कॅप्टन जीएस सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एका, मेजर होशियार सिंग, लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, एफ. अधिकारी निर्मलजीत सिंह सेखो, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंह, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, सुभेदार मेजर (तत्कालीन रायफलमन) संजय कुमार, सुभेदार मेजर निवृत्त (होनी कॅप्टन) आणि योगेंद्र सिंह यादव यांच्या नावावरून या बेटांना नावं मिळाली.
अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आणि नेताजींच्या स्मृतींना सन्मानित करण्यासाठी, रॉस बेटांचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी 2018 साली या बेटाला भेट दिली होती. यामध्ये नील बेट आणि हॅवलॉक बेट या बेटांचं शहीद द्विप आणि स्वराज द्वीप असे नामकरण केलं.