2024 साली नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास
Amit Shaha: सीबीआय आणि ईडी नि:पक्षपातीपणे काम करत आहेत, तपास यंत्रणांच्या कामालाही न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
नवी दिल्ली: येत्या 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला गेल्या वेळपेक्षाही जास्त जागा मिळणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. 1970 नंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
2024 च्या निवडणुकीत भाजपला 303 पेक्षा जास्त जागा मिळतील असं अमित शाह म्हणाले. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या. 543 सदस्यांच्या लोकसभेत एनडीएला जवळपास 350 जागा मिळाल्या आहेत. येत्या निवडणुकीत त्यापेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सीबीआय आणि ईडी नि:पक्षपातीपणे काम करत आहेत. तपास यंत्रणांच्या कामालाही न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असं अमित शाहा म्हणाले.
विरोधकांनी चर्चेसाठी पुढे आल्यास संसदेतील सध्याचा गोंधळ दूर होऊ शकतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. ते म्हणाले की, "विरोधी पक्षांनी दोन पावले पुढे टाकले तर सरकार दोन पावले पुढे टाकेल. असे अनेक मुद्दे आहेत जे राजकारणाच्या पलिकडचे आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही परदेशी भूमीवर देशांतर्गत राजकारणावर चर्चा करण्यास नकार दिला. दोन्ही बाजूंनी लोकसभा अध्यक्षांसोबत बसायला हवे. मग संसदेचे कामकाज चालेल, पण तुम्ही फक्त पत्रकार परिषदा घ्या आणि काहीही करा, असे होत नाही."
केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, "संसद केवळ सत्ताधारी किंवा केवळ विरोधी पक्ष चालवत नाहीत, दोघांनीही एकमेकांशी चर्चा केली पाहिजे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत, विरोधकांनीही त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विरोधकांकडून अद्याप चर्चेचा कोणताही प्रस्ताव आला नाही, त्यामुळे आम्ही कुणाशी चर्चा करायची? संसदेत भाषणस्वातंत्र्य असायला हवे, अशा घोषणा विरोधक देत आहेत. संसदेत पूर्ण भाषण स्वातंत्र्य आहे. तुम्हाला बोलण्यापासून कोणीही रोखत नाही. मात्र प्रत्येकाने नियम पाळावेत."
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा हवाला देत अमित शाह म्हणाले की, "संसदेत चर्चा नियमानुसार होते. तुम्ही रस्त्यावरच्या माणसासारखे संसदेत बोलू शकत नाही. त्यांना या मूलभूत गोष्टी माहीत नसतील तर आपण काय करावे? आणीबाणीनंतर इंदिरा गांधी इंग्लंडला गेल्या होत्या आणि त्यावेळी शहा आयोगाची स्थापना झाली होती. त्यानंतर इंदिरा गांधींना तुरुंगात पाठवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी इंग्लंडमधील काही पत्रकारांनी त्यांना विचारले की तुमचा देश कसा चालला आहे. त्यावर त्या म्हणाल्या की, आमच्या देशात काही समस्या आहेत, परंतु मला त्यावर काहीही बोलायचे नाही. माझा देश चांगला चालला आहे. मी माझ्या देशाबद्दल काहीही बोलणार नाही. इथे मी भारतीय आहे."
ही बातमी वाचा: