(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CAA चा अभ्यास असेल तर चर्चा करायला या! अमित शाहांचं राहुल गांधींना आवाहन
राजस्थानच्या जोधपूरमध्ये नाकरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भाजपकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीनंतर आयोजित सभेत बोलताना अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
जयपूर : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये नाकरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीनंतर आयोजित सभेत अमित शाह बोलत होते.
जनसभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, राहुल गांधी सातत्याने नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर टीका करत आहेत. परंतु जर खरंच त्यांनी या कायद्याबाबत अभ्यास केला असेल तर त्यांनी कधीही आणि कुठेही माझ्यासोबत चर्चा करावी.
अमित शाह म्हणाले की, काँग्रेसला वोट बँकेचे राजकारण करण्याची सवय झाली आहे. काँग्रेस CAA बाबत अपप्रचार करत आहे, लोकांमध्ये अफवा पसरवत आहेत. शाह म्हणाले की, विरोधकांनी मला केवळ एकच गोष्ट सांगावी, त्यांनी मला सांगावं की, आपल्या शेजारच्या देशांमध्ये अल्पसंख्यांकांची (हिंदू, शीख, पारशी, बौद्ध) संख्या कमी का झाली आहे?
अमित शाह यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे की, CAA मुळे लोकांचं नागरिकत्व जाईल, असा दावा करणाऱ्या विरोधकांनी सिद्ध करावं की, या कायद्यामुळे लोकांचं नाकरित्व कसं काय जाईल? या कायद्यामुळे लोकांचं नागरिकत्व धोक्यात आहे असं म्हणणाऱ्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं.
अमित शाह म्हणाले की, आम्ही शरणार्थींच्या मानवाधिकारांचं संरक्षण करु. शाह यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावरही जोरदार टीका केली. शाह म्हणाले की, साहेब आम्ही काहीही केलेलं नाही, केवळ तुमच्या (अशोक गहलोत) जाहीरनाम्यामध्ये लिहिलेल्या एका मुद्द्यावर अंमलबजावणी करत आहोत.
शाह या म्हणाले की, तुम्हाला CAA चा विरोध करायचा आहे, तर खुशाल करा. परंतु कोटामध्ये जी लहान मुलं दररोज मरत आहेत, त्या मुलांची अगोदर चिंता करा. त्या मुलांच्या मातांचा तुम्हाला शाप लागेल. तसेच दिल्ली दरबारात जास्त झुकू नका, असा सल्ला अमित शाह यांनी अशोक गहलोत यांना दिला आहे.
शाह म्हणाले की, विरोधी पक्ष देशाची फसवणूक करत आहे. CAA मुळे देशातील मुसलमानांचं नागरिकत्व जाईल, अशा अफवा ते पसरवत आहेत. परंतु मी सर्वांना आश्वस्त करु इच्छितो की, या कायद्यामुळे लोकांना नागरिकत्व मिळेल, कोणाचंही नागरिकत्व जाणार नाही.