Air India: लघुशंका प्रकरणानंतर Air India कडून नियमांत बदल; मद्यप्राशन करणाऱ्या प्रवाशांना...
Air India Modifies Alcohol Service Policy: एअर इंडियाच्या सुधारित धोरणानुसार, आता प्रवाशांना केबिन क्रूनं सेवा दिल्याशिवाय मद्यपान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Air India Modifies Alcohol Service Policy: अलीकडच्या काळात विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एअर इंडियानं (Air India) आपल्या फ्लाईटमध्ये अल्कोहोल सर्व्ह करण्याबाबतच्या धोरणात बदल केला आहे. सुधारित धोरणानुसार, आता विमान प्रवासात प्रवाशांना मर्यादित (Limited) प्रमाणात दारू देण्यात येणार आहे. आज मंगळवारी (24 जानेवारी) सुधारित धोरणाशी संबंधित बाबी लागू करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांच्या असभ्य वर्तनानंतर धोरणात बदल
महत्त्वाची बाब म्हणजे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (DGCA) टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीला (एअर इंडिया) गेल्या काही दिवसांत दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये प्रवाशांशी असभ्य वर्तन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. सुधारित धोरणात नेमका काय बदल झालाय, हे अद्याप सविस्तरपणे सांगण्यात आलेलं नाही.
क्रू-कर्मचाऱ्यांनी मर्यादित अल्कहोल सर्व्ह करावं
सुधारित धोरणानुसार, क्रू मेंबर्सनी सेवा दिल्याशिवाय प्रवाशांना मद्यपान करण्याची परवानगी नसणार आहे. क्रू मेंबर्सनी मद्य प्राशन करणाऱ्या प्रवाशांच्याबाबतीत दक्ष राहावं. नव्या धोरणानुसार, "अल्कोहोलिक पेय ही प्रमाणात सर्व्ह करावीत. तसेच, एखादा प्रवाशी वारंवार अल्कोहोलयुक्त पेय मागत असेल, तर त्याला नकार देण्याचा अधिकारही क्रू-मेंबर्सना देण्यात आला आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यानं एका निवेदनात म्हटलंय की, एअरलाइन्सनं यूएस नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन (NRA) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित फ्लाइटमध्ये अल्कोहोल ऑफर करण्याच्या सध्याच्या धोरणात बदल केले आहेत. इतर एअरलाइन्सनं अवलंबलेल्या पद्धतीचाच एअर इंडिया आता अवलंब करणार आहे. निवेदनात म्हटलंय की, "हे मुख्यत्वे एअर इंडियाच्या सध्याच्या नियमांशी सुसंगत आहे. तसेच, काही नियमांमध्ये नक्कीच सुधारणा करण्यात आली आहे.
दरम्यान, 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघुशंका केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर प्रवाशाचा शोध सुरू केला. अखेर काही दिवसांनी आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपी शंकर मिश्रा याच्या वडिलांचं पालघर मधील बोईसर येथे हॉटेल आहे. शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या वेल्स फार्म या अमेरिकन बहुउद्देशीय वित्तीय सेवा इंडिया चापटर कंपनीचा उपाध्यक्ष देखील आहे. या घटनेने शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी म्हटलं होतं. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला होता.
शंकर मिश्राची कंपनीकडून हकालपट्टी
शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी वुल्फ फार्गोनं त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. कंपनीच्या वतीनं एक निवेदन जारी करताना म्हटलं होतं की, कंपनी आपल्या कर्मचार्यांकडून व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या योग्य वर्तनाची अपेक्षा करते. शंकर यांच्यावरील आरोप अत्यंत खेदजनक असून त्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे. या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करू, असंही कंपनीनं म्हटलं आहे.