Air India : विमानाच्या केबिनमधून जळण्याचा वास, एअर इंडियाचं विमान मस्कतला वळवलं
Air India Express Flight : एअर इंडियाच्या विमानातून जळण्याचा वास येऊ लागल्याने फ्लाईट मस्कतकडे वळवण्यात आली. याप्रकरणी तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
Air India Express Flight : कालिकतहून दुबईसाठी (Calicut To Dubai) रवाना झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचं मस्कतमध्ये (Muscat) इमर्जंसी लँडींग करण्यात आलं. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर या विमानाच्या केबिनमधून जळण्याचा वास येऊ लागला, यामुळे विमान मस्कतकडे वळवण्यात (Divert) आलं. शनिवारी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एअर इंडिया एक्सप्रेस B737-800 विमान VT-AXX ऑपरेटिंग उड्डाण IX-355 (Calicut To Dubai) हे विमान मस्कटकडे वळवण्यात आलं, कारण त्याच्या केबिनमधून जळका वास येत होता.
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर केबिन क्रूला जळण्याचा वास आला. यानंतर खबरदारी म्हणून विमान मस्कतकडे वळवण्यात आलं आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आलं. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
उड्डाणाआधी झाली होती विमानाची तपासणी
अधिकाऱ्यांनी घटनेबाबत अधिक माहिती देत सांगितलं की, विमान उड्डाणाच्या आधी सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली होती. आयसोलेशन मॅन्युल, ऑन-ग्राउंड इंजिनियरिंगची तपासणी करण्यात आली होती. इंजिन ग्राउंड, रन इंजिन आणि ऑक्झिलरी पॉवर युनिट (APU) या दोन्हींच्या ऑपरेशनसह सर्व तपासण्या केल्या गेल्या. तपासणीवेळी कुठूनही धूर निघत नव्हता.
48 तासांत तीन आंतरराष्ट्रीय विमानांचं इमर्जेंसी लँडिंग
गेल्या 48 तासांत आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांच्या तीन विमानांचं देशातील विविध विमानतळांवर इमर्जेंसी लँडिंग करण्यात आलं. ज्यामुळे विविध विमान कंपन्यांसाठी तांत्रिक आणीबाणीचा दिवस ठरला. या लँडिंग कालिकत, चेन्नई आणि कोलकाता येथे शुक्रवार आणि शनिवारी करण्यात आले. सर्व इमर्जेंसी लँडिंग वेगवेगळ्या तांत्रिक समस्यांमुळे करण्यात आलं, अस नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
48 तासांत तीन घटना
1. पहिली घटना, शारजाहून कोचीनला जाणाऱ्या फ्लाइट क्रमांक G9-426 च्या विमानात हायड्रोलिक बिघाड झाला, ज्यामुळे विमानाचं इमर्जेंसी लँडिंग करण्यात आलं.
2. दुसर्या एका घटनेत, 16 जुलै रोजी आदिस अबाबाहून बँकॉकला जाणाऱ्या इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानानं तांत्रिक बिघाडामुळे कोलकाता विमानतळावर इमर्जेंसी लँडिंग केले.
3. तिसऱ्या घटनेत, 15 जुलै रोजी, हायड्रॉलिक समस्येमुळे श्रीलंकनएअरलाइन्सच्या विमानाचं चेन्नई विमानतळावर इमर्जेंसी लँडिंग करण्यात आलं.