मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी म्हणजे आज रात्री घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन केलं आहे. रात्री 9 वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून 9 मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मोदींच्या या आवाहनानंतर देशभरातून अनेकांनी टीका केली आहे. तरी अनेकांनी या निर्णयाचं स्वागत देखील करत आज लाईट बंद करणार असल्याचं सांगितलं आहे.

मोदींनी काय केलं आवाहन

रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यामुळं चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. या कोरोना महामारीच्या अंधकारात आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या महामारीने सर्वाधिक गोरगरीब प्रभावित झाले आहेत. या कोरोना संकटाच्या अनिश्चिततेला संपवून आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवायचं आहे. 5 एप्रिलला आपल्याला कोरोनाच्या संकटाळा महाशक्तीचं जागरण करायचं आहे.

सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा - मोदी 

मोदी म्हणाले होते की,  हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे. हे आयोजन करताना कुणीही एकत्र यायचं नाही. रस्त्यावर, गल्लीत एकत्र जमायचं नाही. त्यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन ही गोष्ट करायची आहे. आपल्या दारात, बाल्कनीत उभं राहून हे करायचं आहे, असं मोदी म्हणाले.

फक्त लाईट्स बंद करा - केंद्रीय उर्जा मंत्रालय

9 मिनिटे एकाच वेळी लाईट बंद केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य व देश अंधारात जाण्याचा धोका असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्ती केली होती. त्यावर केवळ घरातील लाईट्स बंद करण्यास सांगितले आहे. बाकी रस्त्यावरील पथदिवे, घरातील इतर विद्युत उपकरणे चालूच राहतील, असं स्पष्टीकरण केंद्रीय उर्जामंत्रालयाने दिले आहे. असं केल्याने देश किंवा राज्य अंधारात जाण्याचा धोका नसल्याचंही त्यांनी सांगितले आहे. यावेळी रस्त्यावरील दिवे, घरातील इतर सर्व विद्युत उपकरणे, रुग्णालय, पोलीस ठाण्यासह इतर महत्वाच्या ठिकाणी दिवे चालूच राहणार आहे. त्यामुळे ग्रीडमध्ये फ्रिक्वेन्सी फेल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

लाईट बंद न करता दिवे लावा - नितीन राऊत

जर देशात एकाचवेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी कमी होईल. लॉकडाऊनमुळे आधीच विजेची मागणी घटल्यामुळे जनरेशन आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास अजून परिस्थिती बिघडून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रीडमध्ये अचानक विजेची मागणी वाढल्यास आणि कमी झाल्यास फ्रिक्वेन्सी फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानाचा काळजीपूर्वक विचार जनतेने करावा व लाईट बंद न करता फक्त दिवे किंवा मेणबत्ती लावावी असे आवाहन डॉ. राऊत यांनी जनतेला केले आहे.

9 मिनिटं लाईट शटडाऊन, विजेसंदर्भात केंद्र सरकारचा प्लॅन तयार
केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी पीसीसीआयएल पॉवरग्रीड आणि लोड सांभाळणाऱ्या यंत्रणेसोबत चर्चा केली. पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (पॉस्को) ने यासंदर्भात एक प्लॅन तयार केला आहे. पाचही प्रादेशिक लोड डिस्पॅच केंद्रे आणि नॅशनल लोड डीस्पॅच सेंटर (एनएलडीसी) सह जेणेकरून ब्लॅकआउट दरम्यान मागणी अचानक कमी झाली तरीही ग्रीडची वारंवारता कायम राखली जाईल. तसेच राज्य सरकारला गरज पडल्यास वीज वेळापत्रक निश्चित करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. अचानकपणे मागणी कमी झाल्यानंतर काही युनिट्सचे ग्रीड फ्रीक्वेन्सी बंद करण्यासाठी काही उत्पादक युनिट तयार मोडमध्ये ठेवण्यास सांगितले आहे. एनटीपीसीसारख्या मध्यवर्ती सुविधादेखील ग्रीडच्या आवश्यकतेनुसार त्यांचे काही गॅस आधारित स्टेशन चालू केली जाऊ शकतात.

प्रत्येक गोष्टीचा इव्हेन्ट करावा, असं मोदींना का वाटतं?, विरोधकांची टीका 

मोदींच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीका देखील केली आहे. सगळ्यांच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना पंतप्रधानांकडून उजेड आणण्याची आवश्यकता आहे. अशावेळी तुम्ही सांगता अंधार करा आणि मोबाईलच्या टॉर्च पेटवा. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावा, असं यांना का वाटतं? हा मुर्खपणा आहे अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली.




नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखं कधी बोलणार आहेत का? : बाळासाहेब थोरात

कोरोनाचं संकट अतिशय गंभीर होत चाललं आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात पंतप्रधान कधी टाळ्या वाजवायला सांगतात तर कधी दिवे लावायला सांगतात. लोकांना असं आवाहन देणे हे पंतप्रधानांचं काम आहे का? नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखं कधी बोलणार आहेत का? देशाच्या हिताचे निर्णय घेणार आहेत का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला. आज देशभर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोकांना धीर देणे, मेडिकल साहित्य पुरवणं याकडे पंतप्रधानांनी लक्ष दिले पाहिजे. राज्यांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. आता तरी त्यांनी थोडं गंभीर व्हायला पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा-पाण्याचं बोला : संजय राऊत

शिवसेनेची बाजू भक्कपणे मांडणारे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झालं, अशी टिप्पणी संजय राऊतांनी केली. साहेब (नरेंद्र मोदी) कामाचं आणि लोकांच्या पोटा-पाण्याचं बोला, असा असंही संजय राऊतांनी लिहिलं.

नरेंद्र मोदी यांचा टाळी, थाळी आणि दिवाळी असा त्रिसूत्री दुर्दैवी कार्यक्रम : पृथ्वीराज चव्हाण

मागील 15 दिवसांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे तिसरं भाषण असून प्रत्येकवेळी कोरोनाच्या विरोधात काहीतरी नवीन जुमला लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. आजच्या भाषणात त्यांनी कोरोना संसर्गाविषयीचे आकडे, आरोग्य व्यवस्थेची तयारी, लाखो स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्न, अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने रोजगारावर होणारे परिणाम या सर्व मुद्द्यांना स्पर्श न करता दिवे लावण्याचे आवाहन केले. देश एवढ्या गंभीर परिस्थितीतून जात असतानादेखील कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले भाषण वाचून एकतर्फी संवाद साधण्यापेक्षा पत्रकार परिषद घेउन देशवासीयांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनी टाळी, थाळी आणि आता दिवाळी अशी त्रिसूत्री लोकांसमोर मांडली आहे हे अतिशय दुर्दैवी आहे.

संबंधित बातम्या