मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. डॉक्टर्स, मेडिकल स्टाफ, इतर अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी-अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला उद्देशून एक संदेश दिला. यामध्ये कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं. या आवाहनावर राज्यातील नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.


प्रत्येक गोष्टीचा इव्हेन्ट करावा, असं मोदींना का वाटतं? : जितेंद्र आव्हाड


आजच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी जीवनावश्यक वस्तुंबद्दल बोलतील. देशातील कोणताही गरीब उपाशी झोपणार नाही, मास्क, सॅनिटाएझर आणि औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत याची कमरता पडणार नाही, असं बोलतील अशी संपूर्ण देशाला आशा होती. आम्ही नवीन लस शोधून काढत आहोत, टेस्टिंग किट कमी पडणार नाही, असं नागरिकांना आश्वस्त करतील. देशामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत जनतेला आधार देतील, असं वाटल होतं. मात्र त्यांनी आता नवीन इव्हेंट काढला आहे. अंधार करा आणि दिवे पेटवा. सगळ्यांच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना पंतप्रधानांकडून उजेड आणण्याची आवश्यकता आहे. अशावेळी तुम्ही सांगता अंधार करा आणि मोबाईलच्या टॉर्च पेटवा. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावा, असं यांना का वाटतं? हा मुर्खपणा आहे. मी आज मात्र जाहीर करू इच्छितो, मी काम करतोय. मी गरिबांमध्ये जातोय. मी गरिबांना जेवण देतोय. मेणबत्तीचे पैसेही मी गरिबांना देईल. मात्र, मी माझ्या घरातील लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी मुर्ख नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली.



नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखं कधी बोलणार आहेत का? : बाळासाहेब थोरात


कोरोनाचं संकट अतिशय गंभीर होत चाललं आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात पंतप्रधान कधी टाळ्या वाजवायला सांगतात तर कधी दिवे लावायला सांगतात. लोकांना असं आवाहन देणे हे पंतप्रधानांचं काम आहे का? नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखं कधी बोलणार आहेत का? देशाच्या हिताचे निर्णय घेणार आहेत का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला. आज देशभर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोकांना धीर देणे, मेडिकल साहित्य पुरवणं याकडे पंतप्रधानांनी लक्ष दिले पाहिजे. राज्यांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. आता तरी त्यांनी थोडं गंभीर व्हायला पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.


साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा-पाण्याचं बोला : संजय राऊत


शिवसेनेची बाजू भक्कपणे मांडणारे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या या आवाहनावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झालं, अशी टिप्पणी संजय राऊतांनी केली. साहेब (नरेंद्र मोदी) कामाचं आणि लोकांच्या पोटा-पाण्याचं बोला, असा असंही संजय राऊतांनी लिहिलं.


नरेंद्र मोदी यांचा टाळी, थाळी आणि दिवाळी असा त्रिसूत्री दुर्दैवी कार्यक्रम : पृथ्वीराज चव्हाण


मागील 15 दिवसांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे तिसरं भाषण असून प्रत्येकवेळी कोरोनाच्या विरोधात काहीतरी नवीन जुमला लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. आजच्या भाषणात त्यांनी कोरोना संसर्गाविषयीचे आकडे, आरोग्य व्यवस्थेची तयारी, लाखो स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्न, अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने रोजगारावर होणारे परिणाम या सर्व मुद्द्यांना स्पर्श न करता दिवे लावण्याचे आवाहन केले. नरेंद्र मोदी हे एकमेव जागतिक नेते आहेत की ज्यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ते 31 मार्च या कालावधीत 28 तर इंग्लंडचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी आजारी पडण्याआधी 18 पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना म्हणजेच पत्रकारांच्या माध्यमातून आलेल्या जनतेच्या प्रश्नांना नियमितपणे सामोरे गेले आहेत. देश एवढ्या गंभीर परिस्थितीतून जात असतानादेखील कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले भाषण वाचून एकतर्फी संवाद साधण्यापेक्षा पत्रकार परिषद घेउन देशवासीयांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनी टाळी, थाळी आणि आता दिवाळी अशी त्रिसूत्री लोकांसमोर मांडली आहे हे अतिशय दुर्दैवी आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की 5 एप्रिलला आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले.


संबंधित बातम्या